भूमी अभिलेख कार्यालयाला ठोकले टाळे; ५० हून जास्त जणांना अर्धा तास डांबले

भूमी अभिलेख अधिकाऱ्याशी झालेल्या वादातून संतापलेल्या एका इसमाने चक्क कार्यालयालाच बाहेरून टाळे ठोकून पळ काढल्याची घटना वसईत घडली.

भूमी अभिलेख अधिकाऱ्याशी झालेल्या वादातून संतापलेल्या एका इसमाने चक्क कार्यालयालाच बाहेरून टाळे ठोकून पळ काढल्याची घटना वसईत घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टाळे तोडल्यानंतर अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. प्रशांत धोंडे नावाचा इसम कामानिमित्त तालुका भूमी अभिलेख कार्यालयात आला होता. अधिकाऱ्याच्या केबिनमधून बाहेर पडल्यानंतर त्याने चक्क कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे शटर खाली ओढून टाळे ठोकून तो पसार झाला. दरवाजाला बाहेरून टाळे लावल्याने आतमध्ये कर्मचाऱ्यांसह ५० हून अधिक जण तब्बल ३५ मिनिटे आतमध्ये अडकून पडले होते. वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टाळे तोडून सर्वांना मोकळे केले.

या कार्यालयापासून काहीच अंतरावर वसई पोलीस ठाणे, तहसील कचेरी, प्रांताधिकारी कार्यालय, कोर्ट, पंचायत समिती आदी वसईतील मुख्य सरकारी कार्यालये आहेत. तसेच हे कार्यालयही मुख्य रस्त्यावरच आहे. दुपारची वेळ असल्याने वर्दळीच्या या कार्यालयाला टाळे ठोकल्याची बातमी बाहेर पडल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात धोंडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

शरद पवार बिनचिपळ्यांचे नारद- प्रकाश महाजन यांचा घणाघात