सरपंचाची खोटी सही करुन बोलावली सभा; ग्रामसेवकाचा प्रताप चव्हाट्यावर

डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने सरपंचाला विश्वासात न घेता त्यांची खोटी सही करून ग्रामपंचायतीची सभा बोलावली.

चिंचणी ग्रामपंचायत

डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने सरपंचाला विश्वासात न घेता त्यांची खोटी सही करून ग्रामपंचायतीची सभा बोलावली. इतकेच नाही तर अजेंडावरील विषयांना त्या बेकायदा सभेत मंजूरी दिल्याची तक्रार सरपंच कल्पेश धोडी यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ आणि वाणगाव पोलीस ठाण्यात केली आहे. नगरसेवकाचा हा प्रताप चव्हाट्यावर आल्यावर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोरोना काळ असल्याने सुरक्षिततेसाठी सरपंच कल्पेश धोडी यांनी ग्रामपंचायतीची कोणतीही सभा बोलावली नव्हती. गेल्या पाच महिन्यांपूर्वी आपला पदभार स्विकारलेले ग्रामसेवक रविंद्र थोरात यांनी ३० जुलै २०२१ रोजी सभा लावल्याचा अजेंडा काढला होता. त्या अजेंड्यावर सर्व सोळा सदस्यांच्या अजेंडा पोहोचल्याचे सहया घेण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या सभेच्या अजेंडयावर ग्रामसेवक रविंद्र थोरात यांच्या सहीसोबत सरपंचाची वापरलेली सही झेरॉक्स प्रतीची असल्याची समोर आली आहे.

अजेंड्याची प्रत सरपंच धोडी यांना देण्यात आलेली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ३० जुलै २०२१ रोजी रात्री साडेदहा वाजता सभा होण्याअगोदरच सभेत जा. क्र. ६२६/ ३० जुलै २०२१ रोजी ईंडस टॉवर चिंचणी यांना ना हरकत दाखल्यावर सहीसाठी सरपंच कल्पेश धोडी यांच्या घरी ग्रामपंचायत सदस्य कासिम बच्चुमियॉ मुच्छाले, मोहसिन रियाज शेख आले होते. त्यावेळी दाखला सभेच्या अगोदर कसा काय दिला जात आहे. तसेच रजिस्टरमध्येही त्याची नोंद कशी काय करण्यात आली, असा सवाल कल्पेश धोडी यांनी केला. तेव्हा ग्रामपंचायतीची सभा ३० जूनला होणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये होत असलेला सावळागोधळ धोडी यांच्या लक्षात आला.

चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश धोडी यांनी त्याची सही खोटी वापरून अजेंडा काढून सभा लावल्याचे आणि ठराव केल्याची तकार प्राप्त झाली आहे. आम्ही रितसर चौकशी सुरू केली आहे. सत्यता आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.
– बी. एच. भराक्षे, गटविकास अधिकारी, डहाणू

सरपंचांच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक सरपंचाची खोटी सही वापरून सरपंचाच्या अधिकाराचे हनन करत असल्याची तक्रारच सरपंच कल्पेश धोडी यांनी केल्याने ग्रामसेवकाच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण झाली आहे. धोडी यांच्या गैरहजेरीत असे किती प्रकार करण्यात आले आहे, असा प्रश्न धोडी यांनी समोर आणला आहे. कायद्याला न जुमानणा-या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी धोडी यांनी केली आहे.

सरपंच नसताना ग्रामपंचायतीच्या सभेचा अजेंडा सरपंचाच्या खोटया सहीने संमत करण्यात आल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे याआधी असे किती वेळा झाले आहे, याची रितसर चौकशी होऊन त्यात तथ्य आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी धोडी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, डहाणूचे गटविकास अधिकारी आणि वाणगाव पोलीस ठाण्यात केली आहे.

सभा न होता आणि सभेत विषयाला मंजुरी न मिळताच ईंडस टॉवरला ना हरकत दिल्याची नोंद जावक नोंदवहीत नोंदवण्याची घाई ग्रामसेवक आणि प्रशासनाने का केली असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ३० जुलैची सभा होण्याअगोदरच ग्रामपंचायत सदस्य कासिम बच्चुमियॉ मुच्छाले,मोहसिन रियाज शेख यांनी ३० जुलै २०२१ च्या रात्रीच नाहरकत दाखला पूर्ण जावक क्रमांकासह कसा तयार केला? याचा खुलासा पोलीस चौकशीत पुढे येईल, असे धोडी यांनी सांगितले.

संजू पवार – हे पालघर प्रतिनिधी आहेत. 

हेही वाचा –

रेस्टॉरंटच्या indoor dining मधून कोरोना पसरण्याचा धोका का वाढतो? टास्क फोर्सच्या सदस्याने मांडले मत