वसईः आईच्या चारित्र्यावर संशय असलेल्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईची कुर्हाडीचे घाव घालत, गळा चिरून हत्या केल्याची घटना विरार पूर्वेकडील देपिवली गावात उजेडात आली आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. देपिवली ग्रामपंचायतीच्या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत सुनिता घोगरा (३६) सदस्यपदी निवडून आल्या होत्या. रविवारी रात्री उशिरा सुनिता घोगरा रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे तिच्या पतीला दिसून आले. सुनीता लगेचच भिवंडी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याघटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी सोमवारी तिचा पती आणि अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पहिल्यांदा पोलिसांचा तिच्या पतीवरच संशय होता. पण, चौकशीत मुलानेच हत्या केल्याची कबुली दिली. सुनीता घोगरा या वसई पूर्वेकडील वालीव परिसरातील एका कारखान्यात कामाला होत्या. ती सतत फोनवर बोलत असल्याने तिच्या पतीला तिच्या चारित्र्यावर संशय होता. मुलाच्याही मनात आपल्या आईच्या चारित्र्याबाबत संशय बळावला होता.
रविवारी रात्री सुनिता आणि तिचा मुलगाच घरी होते. जेवण झाल्यानंतर सुनिता झोपी गेल्यावर मुलाने कुर्हाडीने तिच्यावर हल्ला करून तिचा गळा चिरला. रात्री उशिरा आलेल्या पतीने जखमी सुनिताला रुग्णालयात नेले होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. त्याला व्यसन असल्याचीही माहिती समोर आली आहे.