घरपालघरवाढवण बंदराविरोधात आंदोलन दर्यासारखे खवळले

वाढवण बंदराविरोधात आंदोलन दर्यासारखे खवळले

Subscribe

२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई ते आरोंदा (रत्नागिरी) या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वसलेल्या मच्छीमार गावांनी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या व मच्छीमार संघटनांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला.

डहाणू : वाढवण बंदर विरोधात वाढवण परिसरातील गावांचा असलेला आक्रोश राज्य व केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रविवार २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई ते आरोंदा (रत्नागिरी) या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वसलेल्या मच्छीमार गावांनी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या व मच्छीमार संघटनांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत मच्छिमार गावातील मासे बाजार,मच्छी मार्केट,भाजीपाल मार्केट, डायमेकिंग व्यवसाय स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवून गावागावात मुख्य रस्त्यांच्या बाजूला नागरिकांनी मानवी साखळी तयार करून सरकारला खणखणीत इशारा दिला आहे.

वाढवण बंदर परिसरातील धाकटी डहाणू ते चिंचणी खाडीनाका येथील मुख्य रस्त्याच्या कडेला १५ किलोमीटरपर्यंत जवळपास वीस हजार लोकांनी प्रचंड मोठी मानवी साखळी तयार करत विरोध आणि निषेध व्यक्त केला. मानवी साखळीत वाढवण,वरोर, चिंचणी,बहाड,पोखरण,धाकटी डहाणू, गुंगवाडा, तडीयाळे, वासगाव, ओसारवाडी,तणाशी,चंडीगाव, दांडेपाडा यासह विविध गावे सामील झाली होती. मानवी साखळीतील शेकडो महिलांनी एकाच रंगाच्या साड्या, तर शेकडो तरुणांनी “एकच जिद्द वाढवण बंदर रद्द” चे घोषणापत्र लिहिलेले टी-शर्ट परिधान केले होते. या मानवी साखळीत वाढवण बंदर विरोधात जब बनेगा वाढवण बंदर,तब डुबेगी मुंबई, समुद्र आमच्या कोळ्यांचा! नाही कुणाच्या बापाचा, एकच जिद्द वाढवण बंदर रद्द अशा अनेक घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.

- Advertisement -

मानवी साखळीत तान्ही लहान बाळ घेऊन काही महिला सामील झाल्या होत्या. तर, अबालवृद्ध, तरुण-तरुणी, महिला व मुले यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मच्छीमार,शेतकरी,बागायतदार, डायमेकर व्यावसायिक, यांना उध्वस्त करणारे प्रस्तावित वाढवण बंदर कायमचे हद्दपार करण्याची मागणी केली आहे. यावेळी वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कोळी, अल्पेश विसे यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शिवाय राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी ही मागवण्यात आली होती. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने मानवी साखळी आंदोलन शांततेत पार पाडण्याच्या केलेल्या आवाहनाला येथील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिल्याने हे आंदोलन शांततेत पार पडून पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

वसईतही अनेक गावांमध्ये आंदोलने

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये वाढवणला तीव्र विरोध करत गावकरी रविवारी सकाळी रस्त्यावर उतरले होते. वसईतही अनेक गावांमध्ये आंदोलन करण्यात आले. वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्थेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी कोळी महिलांनी बंदराविरोधात जोरदार घोषणा दिल्या. बंदराचे मच्छिमारांवर काय विपरीत परिणाम होतील, याची माहिती संस्थेचे संचालक मिल्टन सौदिया यांनी दिली तर बंदराविरोधातील पुढील लढाई सर्वांना सोबत घेऊन रस्त्यावर लढली जाईल, असा इशारा चेअरमन संजय कोळी यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -