महापालिकेकडे दप्तर ठेवण्यासाठी जागाच नाही

दप्तर विभागासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी यांची आता नेमणूक करण्यात आली असली तरी जागेअभावी दप्तर कुठे ठेवायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.

वसई : वसई- विरार महापालिकेला दप्तर ठेवण्यासाठी जागाच नसल्याने दप्तर सुरक्षितपणे कुठे ठेवायची अशी चिंता प्रशासनाला भेडसावू लागली आहे. तेरा वर्षात महापालिका महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी जागा मिळवू शकली नाही, याबद्दलच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वसई- विरार महापालिकेच्या स्थापनेला तेरा वर्षे झाली आहेत. सध्या विरार येथील जुन्या आणि जवळच बांधलेल्या नव्या इमारतीत मुख्यालयाचा कारभार हाकला जात आहे. जागेची अडचण असल्याने अनेक अधिकार्‍यांना अगदी छोट्याशा केबिनमधून काम करावे लागत आहे. अनेक अधिकार्‍यांचे चेंबर इतकी लहान आहेत की त्याठिकाणी ठराविक नागरिक बसू शकतील इतकीच जागा आहे. कित्येक अधिकार्‍यांच्या चेंबरमध्ये प्रशासनगृहाची स्वतंत्र सुविधाही नाही. त्यातच आता दप्तर ठेवण्याची जागा मिळत नसल्याचे उजेडात आले आहे.
वसई- विरार महानगरपालिका स्थापन होऊन 13 वर्षे झाली आहेत. परंतु महापालिकेचे दप्तर ठेवण्यासाठी जागा नसल्याने कागदपत्रे मात्र वार्‍यावर असल्याचे चित्र आहे. दप्तर विभागासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी यांची आता नेमणूक करण्यात आली असली तरी जागेअभावी दप्तर कुठे ठेवायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या स्थापनेनंतर अनेक विभाग निर्माण करण्यात आले. त्यात पाणी विभाग, घरपट्टी विभाग, बांधकाम, नगररचना,आस्थापना, कर, यासह महापालिका हद्दीत नऊ प्रभाग समित्याही अस्तित्वात आल्या. परंतु गेल्या 13 वर्षांत दप्तर सांभाळण्यासाठी मात्र ना अधिकारी ना दप्तराची जागा अशा अवस्थेत महापालिकेतील कागद पत्रे वार्‍यावर होती. आता आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दप्तर सांभाळण्यासाठी विभाग तयार केला असून या विभागाच्या प्रमुख म्हणून प्रभारी सहाय्यक आयुक्त निलम निजाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या हाताखाली एक शिपाई देण्यात आला आहे. अधिकारी जरी नेमला असला तरी महापालिकेकडे जागाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. १३ वर्षाचे विविध विभागाचे दप्तर ठेवण्यासाठी मोठी जागा लागणार आहे. सध्या महापालिकेत अधिकार्‍यांना बसण्यासाठी जागा नाही. निवडणूक झाल्यावर निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींनाही आता जागा उरलेली नाही. महापौर दालन सोडून इतर दालनांमध्ये अधिकार्‍यांनी आपले बस्तान बसवले आहे. निवडणूक झाल्यास विविध समित्यांचे सभापती कुठे बसणार हाही प्रश्न प्रशासनापुढे पडणार आहे. महापालिकेचे मुख्यालय विरार पश्चिमेला असलेल्या नव्या परिवहन भवनात हलवण्यात येणार आहे. त्यानंतर जुनी इमारत खाली होणार असून जुन्या कार्यालयात दप्तर ठेवण्यासाठी दोन मजले राखून ठेवण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजून काही महिने तरी दप्तराला हक्काच्या जागेसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सध्या ज्या जागेत महापालिकेचे मुख्यालय आहे ती जागा खाली झाल्यावर त्यातील काही जागा पोलीस स्टेशनसाठी पोलीस मागत असल्याचे समजते. महापालिकेच्या सध्याच्या मुख्यालयासमोरच पोलीस स्टेशन असल्याने , महापालिकेची जागा त्यांना सोयीची असणार आहे. महापालिकेचे मुख्यालय हलवण्यानंतर जुन्या इमारतीमध्ये दप्तर ठेवण्यासाठी जागा राहणार की , ही जागा पोलिसांना महापालिका देणार हे येत्या काही महिन्यातच दिसून येईल.

 

महापालिकेचे दप्तर ठेवण्यासाठी सहाय्यक आयुक्त निलम निजाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे दप्तर ठेवण्यासाठी सध्या जागा नाही. मुख्यालय नव्या जागेत गेल्यानंतर जुन्या जागेमध्ये संपूर्ण दप्तर ठवण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कर्मचारी हे नेमण्यात येणार आहेत.
– दीपक कुर्लेकर , उपायुक्त