भाईंदर :- मीरा- भाईंदर महानगरपालिका परिसरातील मीरारोड व भाईंदर शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या बस थांब्याच्या दुरुस्तीचा निर्णय अखेर महापालिकेने घेतला आहे. यात हे बस थांबे जाहिरात करण्याच्या दुष्टीने सात वर्षासाठी कंत्राटदाराच्या हाती देण्यात आले असून त्यातूनच ते जसे आहेत तश्या स्थितीत असलेल्या परिस्थितीत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.  मीरा- भाईंदर महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा आहे. त्यामुळे महापालिकेने प्रवाशांच्या   सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी बस थांब्याची उभारणी केली आहे. याशिवाय शहरात मुंबई व ठाणे शहरात जाणाऱ्या गाड्यांचे बस थांबे आहे. सध्य स्थितीत शहरात १२५ ठिकाणी मिळून एकूण १३० बस थांबे अस्तित्वात आहेत. मात्र यातील बहुतांश महत्वाच्या ठिकाणी असलेले बस थांबे हे मोडकळीस आले आहेत. याने प्रवाशांना देखील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अशा बस थांब्यांच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने  करण्यात येते होती. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता ते शक्य होत नव्हते, म्हणून जाहिरातीच्या माध्यमातून त्याची सुस्थिती राखणे आणि त्यावर जाहिरात बाजी करणे व पालिकेला महसूल गोळा करणे आणि कंत्राटदाराला त्यातून स्वतःचे उत्पन्न सध्या निर्माण करणे असणार आहे.
 बस थांबे दुरूस्तीचा खर्च परवडत नसल्याने यावर उपाय म्हणून आता हे बस थांबे जाहिरात कंत्राटदाराच्या हाती देण्याचा निर्णय आयुक्त संजय काटकर यांनी घेतला आहे. यात निविदा प्रक्रिया राबवून ‘सोलुशन ॲडव्हर्टायझिंग’ या संस्थेची निवड करण्यात आली आहे. यात सात वर्षासाठी बस थांब्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे. या मोबदल्यात कंत्राटदाराला जाहिराती प्रसिद्ध करून उत्पन्न मिळवण्याची सुट देण्यात आली आहे.
 महापालिकेला साडेसात कोटीचे उत्पन्न
मीरारोड व भाईंदर शहरात नव्याने बीओटी ( बांधा वापरा हस्तांतरित करा ) तत्वावर उभारण्यात आलेल्या बस थांब्यामुळे महापालिकेला सात वर्षात ५ कोटी कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. याशिवाय आता जुन्या बस थांब्याची जबाबदारी देखील कंत्राटदाराच्या हाती देण्यात आल्याने त्यातून सात वर्षात २ कोटी ३९ लाखाचा लाभ होणार आहे. एकंदरीत बस थांब्यामुळे महापालिकेला एकूण साडेसात कोटींचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती परिवहन विभागाचे प्रमुख दिनेश कानगुडे यांनी दिली आहे.