भंगार चोरीचा डाव उधळला

मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास बंद कंपनी शेडची पोलिसांनी पाहणी केली.यावेळी गॅस कटरच्या सहाय्याने कापण्यात आलेले लोखंडी अँगल चे तुकडे जागेवर आढळून आले.

बोईसर: तारापूर एमआयडीसी  लगत एका बंद कंपनीतील भंगार चोरीचा प्रयत्न जागरूक ग्रामस्थांनी उधळून लावला. या घटनेच्या निमित्ताने एमआयडीसी मधील भंगार माफीया पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येते. तारापूर एमआयडीसी जवळ कोलवडे ग्रामपंचायत हद्दीतील महसूल विभागाच्या गट क्रमांक २१३/२ या जागेवर गेल्या दहा वर्षापासून बंद असलेल्या रामशाम टेक्स्टाईल या कंपनीची लोखंडी शेड उभी आहे.कंपनी बंद असल्यामुळे या जागेवर प्रचंड जंगल माजले असून मुख्य रस्त्यापासून १०० फूट आत असलेली लोखंडी शेड गॅस कटरच्या सहाय्याने कापण्याचे काम  शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अज्ञात लोकांकडून सुरू करण्यात आले होते. रात्रीच्या अंधारात गुपचूप सुरू असलेल्या या कामाची खबर स्थानिक ग्रामस्थांना लागताच भंगार चोरांनी काम अर्धवट सोडून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर ग्रामस्थांनी या चोरीची खबर बोईसर पोलिस स्टेशनला दिल्यावर मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास बंद कंपनी शेडची पोलिसांनी पाहणी केली.यावेळी गॅस कटरच्या सहाय्याने कापण्यात आलेले लोखंडी अँगल चे तुकडे जागेवर आढळून आले.
सन २०१२ साली कोलवडे येथे रामशाम टेक्स्टाईल या कंपनीच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली होती. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अंधेरी शाखेकडून मालकाने कर्ज घेतले होते. मात्र कर्जाचे हप्ते थकल्याने ही मालमत्ता बँकेकडे गहाण पडली होती. गेल्या दहा वर्षापासून या जागेवर फक्त पडीक बांधकाम आणि शेकडो टन वजनाचा लोखंडी सांगाडा उरला आहे. तारापूर एमआयडीसी परिसरातील अनेक भंगार माफीयांची नजर या लोखंडी शेडवर होती. मात्र कोलवडे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे भंगार चोरांचा डाव यशस्वी होत नव्हता. शनिवारी रात्री अंधाराचा फायदा घेत शेकडो टन वजनाची लोखंडी शेड विकून लाखो रुपये कमावण्याचा भंगार माफिया आणि त्यांना साथ देणाऱ्यां परिसरातील च काही लोकांचा डाव जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडला.
तारापूर औद्योगिक वसाहती मधील कोलवडे,कुंभवली,सालवड या परिसरातील काही बंद असलेल्या कारखान्यातील लोखंड,सळया आणि यंत्रसामग्री चोरण्यासाठी भंगार माफियांच्या काही टोळ्या सक्रिय आहे.अवध नगर येथे गोदामे असलेले भंगार माफिया स्थानिक लोकांना हाताशी धरून हा भंगार चोरीचा अवैध धंदा चालवत असून यामध्ये महीन्याकाठी करोडो रुपयांचा व्यवसाय केला जातो.बोईसर पोलिसांच्या डोळ्यादेखत ही लूट होत असताना अजून पर्यंत एक ही भंगार किंवा केमिकल माफिया वर लक्षात राहण्याजोगी कारवाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे पोलिसांच्या तपासाच्या कार्य पद्धतीवर देखील शंका उपस्थित केली जात आहे.