डहाणू: भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात 17 ऑगस्टपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपात, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. या दरम्यान कमाल आणि किमान तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. सरासरी १५ ते २० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील असे म्हटले आहे. १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचे संकेत असताना पावसाची आकडेवारी सरासरी एवढी किंवा सरासरीपेक्षा कमी असेल. २५ ऑगस्टपासून पुढे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महावेधच्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी २१६.० मिमी पडतो तर १० ऑगस्टपर्यंत ७७.१ (३५.७%) मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मॉन्सून हंगामात पालघर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१३५.९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तशी माहिती कृषि विज्ञान केंद्र येथील जिल्हा कृषि हवामान केंद्राकडून प्राप्त झाली. पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आणि तापमान जास्त राहणार असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी कमी होईल. त्यामुळे भात खाचरात बांधबंधिस्ती करून पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी. पाण्याची गरज पडल्यास बाह्य स्त्रोतातून पाणी पुरवावे. खते देणे व फवारणीची कामे पावसाचा अंदाज घेवून उघडीप असताना पूर्ण करण्याचा सल्ला कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.