पालघर : पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ४४३ शाळांचा वीज बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याची निराशाजनक बातमी समोर आली आहे. वीज बिल न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कार्यभार पहायला मिळत आहे. पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या एकूण २१३४ शाळांमधील ४३६ शाळांनी वीजबिल भरले नसल्यामुळे शाळांची वीजजोडणी कापण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून त्याआधी या शाळांची वीजजाडणी पूर्ववत होणे आवश्यक होते. मात्र वीजपुरवठा खंडित असल्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात आणि डासांच्या सहवासात शाळेत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे शाळांमधील दूरदर्शन संच, प्रोजेक्टर, संगणक अशी साधनेही वापराविना धूळखात पडल्याचे निदर्शनास येत आहे.जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल हे व्यावसायिक दराने आकारले जाते.
हे बिल मुख्याध्यापक त्यांच्याकडे येणार्या निधीतून भरत असतात. मात्र, सध्या हा निधी रोखला गेल्यामुळे अनेक शाळांना वीज बिलाचा भरणा करता आला नाही. याबाबत शासन दरबारी माहिती असतानाही वीज मंडळाने या शाळांची वीजजोडणी कापली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल भरण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर असते. याचबरोबर अनेक शाळांचे मुख्याध्यापत विविध निधीतून वीज बिल भरत असतात. मात्र, यंदा सर्व स्तरावरून येणारे निधी रोखण्यात आले होते. वेतनेतर अनुदानही बंद आहे. यामुळे शाळांना कोणताही खर्च करणे अवघड झाले आहे.
अनेक गावांमध्ये लोकसहभागातून शाळा डिजिटल केल्या गेल्या आहेत. आता या शाळांमध्ये वीज नसल्यामुळे शिक्षक शाळेत आले, तरी ऑनलाइन वर्गासाठी त्यांना मोबाइलचाच वापर करावा लागत आहे. यामुळे सुविधा असूनही त्याचा फायदा घेता येत नाही.
प्रतिक्रिया-
सदर शाळांना घेण्यात आलेली वीज जोडणी हे घरगुती नसून व्यवसायिक आहे, ज्यामुळे वीज बिल भरमसाठ आले आहे. त्यामुळे आम्ही सर्व मुख्यध्यापकांना लेखी आदेश काढले आहेत की, सर्वांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन व्यावसायिक मीटर ऐवजी घरगुती मीटर बसविण्यासाठी फार्म भरून घ्यावा. सध्या या प्रकरणी २०% निधी प्राप्त झाली आहे. ८०% निधी येणे बाकी आहे.
– प्रकाश निकम- अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर
चौकट –
तालुका निहाय वीज पुरवठा खंडीत शाळा
विक्रमगड ५३
पालघर १३
जव्हार ९१
मोखाडा ६७
डहाणू ८०
तलासरी ६४
वाडा ६८