घरपालघरइमारतीचा स्लॅब कोसळला, ३० कामगार बचावले

इमारतीचा स्लॅब कोसळला, ३० कामगार बचावले

Subscribe

इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समजताच तारापूर अग्निशमन दल,बोईसर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप कसबे आणि एमआयडीसीचे उपअभियंता मुकेश लांजेवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच स्लॅबच्या ढीगार्‍याखाली कोणीही कामगार अडकले नसल्याची खातरजमा केली.

बोईसर: बोईसरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे ३० कामगार सुदैवाने बचावले आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील चित्रालय परिसरातील हॉटेल सरोवर समोरील प्लॉट क्र.पी-१६४ आणि १६५ या भूखंडावर श्रीराम कृष्णा रियाँल्टी या विकासकामार्फत तळ अधिक एक मजली व्यापारी इमारतीचे काम सुरू होते. नवीन बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीच्या तळ मजल्याचे स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अचानक स्लॅब खाली कोसळला.स्लॅब सोबतच बांधकाम साहित्य आणि त्यावर काम करणारे १० ते १२ कामगार देखील खाली कोसळले.यामध्ये एक कामगार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर इमारतीच्या आजूबाजूला काम करणारे उर्वरित इतर १८ कामगार कोणतीही दुखापत न होता सुदैवाने बचावले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समजताच तारापूर अग्निशमन दल,बोईसर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप कसबे आणि एमआयडीसीचे उपअभियंता मुकेश लांजेवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच स्लॅबच्या ढीगार्‍याखाली कोणीही कामगार अडकले नसल्याची खातरजमा केली.

बोईसर आणि तारापूर औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी आणि व्यापारी इमारतींची नवीन बांधकामे सुरू आहेत.या ठिकाणी विकासकांकडून निश्चित आणि मंजूर आराखड्याप्रमाणे बांधकामे न करताच त्यामध्ये बेकायदा बदल करून सर्रास अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.त्याचप्रमाणे बांधकामांमध्ये निकृष्ठ प्रकारचे सिमेंट,वाळू,सळ्यांसारखे साहित्य वापरले जात असून कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षित साधने न देताच उंच इमारतींवर धोकादायकरित्या कामाला जुंपण्यात येत आहे.त्यामुळे कामगारांना बांधकामांच्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -