… तर तनिष्काचा जीव वाचला असता

पाण्यात वीज प्रवाह सुरु असल्याची माहिती दिल्यानंतर महावितरणने तब्बल २० मिनिटांनी वीज प्रवाह खंडीत केला. जर तात्काळ वीज पुरवठा खंडीत केला असता तर तनिष्का कांबळेचा जीव वाचला असता, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे.

वसईः पाण्यात वीज प्रवाह सुरु असल्याची माहिती दिल्यानंतर महावितरणने तब्बल २० मिनिटांनी वीज प्रवाह खंडीत केला. जर तात्काळ वीज पुरवठा खंडीत केला असता तर तनिष्का कांबळेचा जीव वाचला असता, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे.गेल्या मंगळवारी संध्याकाळी तनिष्का कांबळे आपल्या इमारतीतून कोचिंग क्लासला जाण्यासाठी खाली उतरली होती. तिचा कोचिंग क्लास रस्त्यापलीकडे असलेल्या इमारतीत होता. ती खाली उतरली तेव्हा पाऊस पडत होता. इमारतीच्या खाली पाणी साचले होते. तिने त्या पाण्यात पाय ठेवताच तिला विजेचा धक्का लागला. तिला वाचवायला जवळील किराणा दुकानदार आणि दोन मुले गेली. मात्र त्यांनादेखील विजेचा धक्का लागला. ते पाहून कुणी पुढे आले नाही.

पाण्यात वीज प्रवाह असल्याचे लक्षात आले. नागरिकांनी लगेच महावितरणाला फोन केला. मात्र कुणी प्रतिसाद दिला नाही. शेवटी २० मिनिटांनी महावितरणाने वीज प्रवाह खंडित करण्यात आला असा आरोप स्थानिक रहिवाशी प्रशांत भोसले यांनी केला आहे. जर तात्काळ महावितरणाने वीज प्रवाह खंडित केला असता तरी तिचा जीव वाचला असता असेही त्यांनी सांगितले.तनिष्काला शॉक लागला त्याठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहक वाहिन्या आहेत. त्या तीन ठिकाणी कट झालेल्या होत्या. त्यामुळेच त्यातून वीज प्रवाह पाण्यात उतरून तनिष्काचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे उजेडात आले आहे. तनिष्काच्या मृत्यूला महावितरणच जबाबदार असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.दरम्यान, तनिष्काचा मृत्यूनंतर अद्यापही पोलिसांनी कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युतकडून या अपघाताचा तपास सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याने स्थानिक नागरीक संतापले आहेत.