बोईसर:मनोज जरांगे पाटील यांनी बोईसर येथे जरूर यावे. परंतु त्यांनी केवळ मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने सभेला संबोधित करावे. परंतु ओबीसी समाजाविषयी व आमच्या असलेल्या आरक्षणात मराठा समाजाला सहभागी करावे, ही बेकायदेशीर मागणी करून येथील सामाजिक एकोपा बिघडविण्याचा प्रयत्न मुळीच करू नये. व तसे केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी ओबीसी हक्क संघर्ष समिती पालघर जिल्ह्याच्या वतीने बोईसर पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
औद्योगिक आणि नोकरीनिमित्त या जिल्ह्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातून व राज्यातून इतर समाज हा इथे आलेला आहे. त्यात काही प्रमाणात मराठा समाजही आहे. मग असे असताना पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे (ता २१) नोव्हेंबर सर्कस मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांनी नोकरीनिमित्त आलेल्या मराठा समाजासमोर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मागणी केल्यास ती येथील मूळ समाज असलेल्या ओबीसी समाजाला दुखविणारी, भडकविणारे भाषा नसेल का ? असा ही प्रश्न समितीने निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. त्यांना मराठा आरक्षण मिळण्याच्या विरोधात नाही. परंतु ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळावे. या मागणीच्या तीव्र विरोधात आहोत,असे समितीचे म्हणणे आहे.
जरांगे पाटील यांनी आरक्षणाविषयी संबोधित करावे. ओबीसी समाजाच्या विषयी त्याच्या भावना दुखावतील असे कोणतेही वक्तव्य करू नये असे निवेदन ओबीसी हक्क संघर्ष समिती पालघर जिल्हा यांच्या तर्फे पोलीस निरीक्षक बोईसर पोलीस प्रशासक यांना देण्यात आले. समितीच्या वतीने निवेदन देण्याकरिता कुंदन संखे, पी.टी.पाटील, अशोक वडे, मुकेश पाटील, अरविंद वर्तक, रुपेश पाटील, नचिकेत राऊत, अल्पेश संखे, रुपेश संखे, तन्मय संखे उपस्थित होते.