घरपालघर... म्हणून लाखो रूपयांचे साहित्य उद्यानाबाहेर धूळखात

… म्हणून लाखो रूपयांचे साहित्य उद्यानाबाहेर धूळखात

Subscribe

कर्मचारी आणि अभियंत्यांच्या मनमर्जीमुळे उद्यानात बसवण्यात येणारे लाखो रुपयांचे साहित्य या उद्यानाबाहेर पडून आहे. परिणामी हे साहित्य चोरीला जाण्याची भीती परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

वसईः वसई-विरार महापालिका क्षेत्रातील ३५ उद्यानांत लहान मुलांची खेळणी आणि व्यायामाचे साहित्य बसवण्याचा निर्णय बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यापैकी बहुतांश उद्यानांत ही खेळणी बसवण्यात आली आहेत. केवळ प्रभाग समिती ‘बमधील एक-दोन उद्यानांत हे साहित्य बसवणे बाकी असताना बांधकाम विभागाशी समन्वय साधण्याऐवजी उद्यान विभाग या कामात ‘कोलदांडा घालण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. या उद्यानांची साफसफाई आणि गेट उघडून दिला जात नसल्याने कर्मचारी आणि अभियंत्यांच्या मनमर्जीमुळे उद्यानात बसवण्यात येणारे लाखो रुपयांचे साहित्य या उद्यानाबाहेर पडून आहे. परिणामी हे साहित्य चोरीला जाण्याची भीती परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

वसई-विरार महापालिकेच्या नऊही प्रभागांत एकूण १५२ उद्याने आहेत. पहिल्या टप्प्यात यातील ३५ उद्यानांत लहान मुलांची खेळणी आणि व्यायामाचे साहित्य बसवण्याचा निर्णय बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. प्रभाग समिती ‘बमधील विरार स्थानकाजवळील पिंपळवाडी येथील पंढरीनाथ चौधरी उद्यानातही हे साहित्य बसवण्यात येणार आहे. मेसर्स खालसा या निविदाकाराच्या माध्यमातून हे साहित्य बसवले जात आहे. सद्यस्थितीत महापालिका आयुक्तांनी हे साहित्य बसवून घेण्याची जबाबदारी उद्यान विभागाला सुपूर्द केलेली आहे. त्यामुळे सदर उद्यानांची साफसफाई करून घेण्याची आणि साहित्य बसवण्याकरता संबंधित ठेकेदाराला सहकार्य करण्याची जबाबादारी उद्यान विभागाच्या प्रमुख अभियंत्यांवर सोपविण्यात आलेली आहे.

- Advertisement -

मात्र, उद्यान विभागाचे कनिष्ठ अभियंता आणि संबंधित अधिकारी या उद्यानातील साफसफाई-देखभाल करत नसल्याची व उद्यानाचे गेट उघडून देत नाहीत, अशी तक्रार बांधकाम विभागाला प्राप्त झालेली होती. कर्मचारी आणि अभियंत्यांच्या मनमर्जीमुळे लाखो रुपयांचे साहित्य उद्यानाबाहेर पडून आहे. हे साहित्य चोरीला अथवा त्याची नासधूस होण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. या तक्रारीनंतर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी उद्यान विभागाच्या अभियंत्याला फैलावर घेऊन तात्काळ या उद्यानाची साफसफाई करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

०००

- Advertisement -

आयुक्तांच्या संकल्पाला अभियंत्यांची दृष्ट

महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदाची जबाबदारी कौस्तुभ तामोरे यांच्यावर आहे. कौस्तुभ तामोरे यांचे कामकाज वादग्रस्त राहिलेले आहे. याआधी त्यांच्यावर जाहिरात विभागाची जबाबदारी होती. या जबाबदारीदरम्यान पालिकेचा ‘होर्डिंग्ज घोटाळा समोर आलेला होता. प्रत्यक्ष संख्येपेक्षाही शहरातील होर्डिंग्जची संख्या जास्त असल्याने पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडित गेलेला आहे. या होर्डिंग्जचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल तयार करण्याचे काम कौस्तुभ तामोरे यांच्यावर होते. मात्र त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नसल्याने त्यांची उचलबांगडी करून त्यांना उद्यान विभागात पाठविण्यात आलेले आहे. त्याही अगोदर सर्वाधिक अनधिकृत बांधकामे होत असलेल्या पेल्हार व वालीव प्रभागांत अनधिकृत बांधकामविरोधी विभागात ते होते. मात्र त्या ठिकाणची कारकीर्दही त्यांची आत्यंतिक वादग्रस्त राहिलेली आहे. पालिकेपेक्षा भूमाफियांसाठी कार्यरत राहिल्याने त्यांची त्या ठिकाणाहूनही उचलबांगडी करण्यात आलेली होती. मनमर्जी आणि शानोछौकीमुळे पालिकेत ते चर्चेत असतात. वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात वसई-विरार शहराला ‘गार्डन सिटी म्हणून लौकिक प्राप्त करून देण्याचा संकल्प सोडलेला होता. आगामी 2024-25 च्या अर्थसंकल्पाआधी या संकल्पाची पूर्ती होत असताना अभियंता कौस्तुभ तामोरे यांनी आयुक्तांच्या या संकल्पालाच ‘दृष्ट लावण्याचे काम केले आहे,अशी त्यांच्यावर टीका होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -