ग्रामीण भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला

भुरट्या चोर्‍या वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे,रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.

नाजिम खातीब,मनोर: पालघरच्या ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे.मनोर आणि चहाडे नाक्यावर मेडिकल स्टोअर,तर मासवण नाक्यावर किराणा दुकान चोरांनी फोडले तर मनोर गावात रस्त्या लगत उभा टेम्पो चोरांनी पळवून नेला आहे.चोरांनी दोन्ही मेडिकल स्टोअरचे शटर फोडून रोख रक्कम आणि महागडी औषधे लांबवली.भुरट्या चोर्‍या वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे,रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे. पालघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चहाडे नाक्यावरील मेडिकल स्टोअरचे शटर फोडून चोरट्यांनी रोख रकमेवर डल्ला मारला आहे.मेडिकल स्टोअरमध्ये चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी मेडिकल स्टोअरचे शटर तोडून प्रवेश करून स्टोअर मधील रोख रक्कम आणि महागडी औषधे लांबवली आहेत.पालघर पोलिसांकडून चोरीचा तपास सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री मनोर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात असलेले सुमन मेडिकल स्टोअरचे शटर तोडून चोरट्यांनी मेडिकल स्टोअरमधील रोख रक्कम आणि महागडी औषधे चोरी केली.मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारे कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शटर फोडलेले दिसल्याने चोरीची घटना उघडकीस आली. सोमवारी रात्री मासवण नाक्यावरील किराणा मालाचे दुकानात चोरी झाली होती. दुकानाच्या छताचे पत्रे फोडून चोरटे दुकानात शिरले होते.चोरांनी खाद्यतेलाचे डबे आणि रोख रक्कम लांबवली.

सोमवारी रात्री मनोर गावातील पारिजात नगर इमारती समोर उभा असलेला आयशर टेंपो (MH48AY3602)चोरीला गेला आहे. टेंपोत असलेल्या जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीमनुसार रात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास टेम्पो मनोरमधून निघाला होता. महामार्गावरील नांदगावच्या हद्दीत पोहोचल्यानंतर चोरांनी जीपीएस सिस्टीम बंद करून टेम्पो घेऊन गुजरात राज्याच्या दिशेने गेल्याचे आढळून आले.टेम्पो चोरी प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्ग लगतच्या गावातील गाड्यांच्या बॅटरी चोरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असताना ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बॅटरी चोर आणि गाडीतील डिझेल चोरीचे प्रमाण रोजचे झालेले आहे. नागरिकांनी आपल्या गाड्या कसे सुरक्षित ठेवायचे हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.