थर्टीफस्टवर पोलिसांची करडी नजर; रिसॉर्टचालकांना फटका

समुद्रकिनाऱ्यासह रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवर थर्टीफस्टची पार्टीवर सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाचे विघ्न कायम आहे. राज्य सरकारने रात्रीचा कर्फ्यू लागू केल्याने यंदा थर्टीफस्टवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

समुद्रकिनाऱ्यासह रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवर थर्टीफस्टची पार्टीवर सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाचे विघ्न कायम आहे. राज्य सरकारने रात्रीचा कर्फ्यू लागू केल्याने यंदा थर्टीफस्टवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. मीरा भाईंदर, वसई विरारसह पालघर जिल्ह्यात थर्टीफस्टवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यामुळे नववर्षांच्या स्वागताच्या उत्साहावर यंदाही विरजण पडले आहे. कोरोना आणि ओमीक्रॉनचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी नववर्षाचे स्वागत साधेपणाचे आवाहन केले असून नियमांचा भंग केल्यास कारवाईचाही इशारा दिला आहे. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजीनागरिकांकडून मोठया प्रमाणात आनंदोत्सव (सेलिब्रेशन) साजरा केला जातो. रात्री बारा वाजता नवीन वर्षाचे स्वागतासाठी सामान्य नागरिक व महिलादेखील मोठ्या प्रमाणात घराबाहेरआलेले असतात. त्यामुळे रिसॉर्ट, फार्म हाऊससह समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळलेली असते.

त्याअनुषंगाने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्यावतीने संपूर्ण पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये अपर पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उपआयुक्त व सर्व सहायक पोलीस आयुक्त यांचे देखरेखेखाली १६५ पोलीस अधिकारी, ५२८ पोलीस अंमलदार, ९८ होमगार्ड, २ आरसीपी प्लाटून व १ एसआरपीएफची कंपनी असा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. यावेळी धार्मिक व पर्यटन ठिकाणी गस्त, विविध ठिकाणी नाकाबंदी, समुद्र किनारी तसेच विविध भागामध्ये पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. सध्या कोविडसह ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या नियमावलीचे पालन करण्यात येते किंवा नाही यावर देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. बंदीस्त जागेमध्ये जास्तीत जास्त १०० व्यक्ती, मोकळ्या जागेच्या ठिकाणी २५० किंवा उपस्थिती मर्यादेच्या २५ टक्के यापैकी जी मर्यादा कमी असेल इतकेच लोक उपस्थित राहू शकणार आहेत. तसेच उपहारगृहे ५० टक्के क्षमतेनेच चालू ठेवण्याची परवानगी असून सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

शासनाचे निर्देश व कायद्याचे पालन करण्यासाठी कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास पोलीस दलाकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागतहे साध्या पद्धतीने व महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पालघर जिल्ह्याला ८५ कि.मी.चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मुंबई, ठाणे शहर व इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक हे पालघर जिल्ह्यात जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळी येतात. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायकॉन हा नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमायकॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच यावर्षी ३१ डिसेंबर, २०२१ (वर्षअखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याच्या दृष्टीने पालघर पोलीस दल सज्ज आहे. पालघर जिल्ह्यात ८५ ठिकाणी नाकाबंदी व फिक्स पाईट नेमले आहेत.

शासनाचे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षीसुद्धा रिसॉर्टधारकांच्या पोटावर पाय ठेवला आहे. मागील दोन वर्षापासून आम्ही मोठ्या आर्थिक संकटात सापडलो आहोत. यंदा कर्फ्युसह इतरही निर्बंध लादण्यात आल्याने बहुतेक रिसॉर्टचालकांना थर्टीफस्टच्या पार्टी आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाही मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
– रामदास मेहेर, अध्यक्ष, वसई-विरार अर्नाळा रिसॉर्ट संघटना

सर्व पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसगस्त व हॉटेल, लॉजेस, सभागृह, पर्यटन स्थळे, चेक करणे तसेच अवैध दारु, अंमली पदार्थ, गुटखा यांच्यावर कारवाई करण्याकरता वेगवेगळी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. पालघर पोलीस दलातर्फे १ पोलीस अधीक्षक, १ अपर पोलीस अधीक्षक, ४ पोलीस उप अधीक्षक, ४३ पोलीस अधिकारी व ५४३ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर, पर्यटन स्थळावर अशा सार्वजनिक ठिकाणी पालघर पोलीस दलाकडून डिजिटल व्हिडीओ कॅमेऱ्याचे सहाय्याने निरीक्षण करण्यात येणार आहे. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. फटाक्याची अतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दारु पिऊन वाहन चालवणे, दारु पिऊन सार्वजनिक ठिकाणी वावरणे, यावर कारवाई केली जाणार असून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस पोलीस कोठडीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

रिसॉर्ट चालकांना फटका

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या वर्षीही वसईतील रिसॉर्ट धारकांना मनाई केली आहे. गतवर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक वसईत दाखल होतात. परंतू यंदाही परवानगी नसल्याने रिसॉर्टधारक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई तालुक्यात ऐतिहासिक वास्तू, प्राचीन धार्मिकस्थळे आणि सागरीकिनारे आहेत. दरवर्षी गतवर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागतासाठी हजारो पर्यटक येथे येतात. पण, यावर्षी कोरोनाच्या भितीने पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. यावर्षी साधी विचारपूससुद्धा झाली नसल्याची खंत अनेक रिसॉर्टधारकांनी व्यक्त केली आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी रिसॉर्टधारकांनी जय्यत तयारी सुरू केली होती. अचानक मनाई आदेश लागू केल्यामुळे आगाऊ नोंदण्या रद्द करण्याची वेळ काही रिसॉर्टधारकांवर आली आहे.

हेही वाचा –

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा वरचष्मा; मविआला मोठा धक्का