सफेद कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी; यंदा सफेद कांद्याचे उत्पादन कमी

सफेद कांद्याचे आगार म्हणून ज्या गावाची ओळख आहे, अशा म्हसरोली येथील शेतकऱ्यांच्याच डोळ्यात सफेद कांद्याने अक्षरशः पाणी आणले आहे.

अमोल सांबरे  – विक्रमगड वार्ताहर 

सफेद कांद्याचे आगार म्हणून ज्या गावाची ओळख आहे, अशा म्हसरोली येथील शेतकऱ्यांच्याच डोळ्यात सफेद कांद्याने अक्षरशः पाणी आणले आहे. यावर्षी कांदा रोप तयार करण्यासाठी बी पेरणीच्या काळात अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात बी कुजल्याने कांदा वाढीच्या काळात ढगाळ वातावरण असल्याने कांद्याची वाढ झाली नसल्याने भागातील सर्वच सफेद कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन घटल्याने सफेद कांद्याचे भाव वाढतील, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षात कोरोना व निर्बंधांमुळे सफेद कांदा लागवड शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर गेल्या वर्षीही बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी चांगले उत्पादन येईल या आशेवर असताना कांदा रोप तयार करण्यासाठी बी पेरणीच्या काळात अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात बी कुजल्याने कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सफेद कांद्याचे निम्मे उत्पादन घटले असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. सफेद कांदा उत्पादक गेल्या तीन वर्षांपासून संकटात आहे.
– अनिल गोपाळ जाधव, सफेद कांदा उत्पादक, शेतकरी

विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सात ते आठ वर्षापासून खरीपातील भातपीक कापणीनंतर डिसेंबरमधे सफेद कांद्या लागवड केली जात आहे. मात्र या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत गावातील शेतकऱ्यांकडून सफेद कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. विक्रमगड तालुक्यापासून जवळ असलेल्या मुंबई, वसई विरार, पालघर, नालासोपारा, भाईंदर अशा शहरांतून या कांद्याला होणारी मागणी लक्षात घेऊन म्हसरोली गावातील शेतकरी अधिक प्रमाणात सफेद कांद्याची लागवड करू लागले आहेत. एकट्या म्हसरोली गावात सुमारे १२० शेतकऱ्यांनी अंदाजे १३० ते १४० एकर क्षेत्रात सफेद कांद्याची लागवड केली आहे.

अवकाळी पाऊसामुळे कांदा रोप कुजून गेले आणि आता ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कांद्याची वाढ झाली नाही. सफेद कांदा उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे म्हसरोळीचे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. त्यात मिरची लागवडीवर काळे थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मिरचीचे उत्पन्नच निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
– किरण विलास ठाकरे, शेतकरी

एकरी ३० ते ४० हजार खर्च सफेद कांद्याला येत असून खर्च सोडून यातून एकरी ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. येथील सफेद कांदा उत्तम दर्जाचा असल्याने त्याला समुद्रकिनारपट्टीत मोठी मागणी असते. मागील दोन वर्षी ऐन हंगामात कोरोनाचा कहर वाढल्याने शेतकरी भुईसपाट झाला. त्यात गेल्यावर्षी बुरशीजन्य रोगामुळे सफेद कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने गेल्यावर्षीही सफेद कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले होते.
यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेवर पुन्हा नव्याने उभारी घेत शेतकऱ्याने जानेवारी महिन्यात कांदा लागवड केली. कांदा रोप तयार करण्यासाठी कांदा बी पेरणी केल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे बी कुजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर कांदा रोपवाढीच्या काळात ढगाळ वातावरण असल्याने करपा रोगाचे प्रादुर्भाव झाल्याने कांद्याची वाढ झाली नाही. त्यामुळे निम्म्या उत्पादनात घट होणार असल्याचे म्हसरोळी येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

सफेद कांद्याचे औषधी गुणधर्म

सफेद कांद्याला औषधी गुणधर्म आहे. जर सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताजा कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते. रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते. हे मधुमेह रोगावर परिणाम करते. कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमिनो अॅसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते. रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते. यामुळे अॅसनिमियाही दूर होतो, असे जाणकार शेतकरी सांगतात.

हेही वाचा –

दोन दिवसांत अनिल परबांची केस दापोली कोर्टात; किरीट सोमय्यांचा पुन्हा इशारा