तलासरी येथे अपघातात तिघांचा मृत्यू

नाशिक हरसूल बारीमाळ इथे राहणारे हे तरुण संजान येथे कंपनीमध्ये कामाला जात असताना रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

डहाणू: मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार 25 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तलासरी सुत्रकार फाटा येथे झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तलासरी तालुक्यातील ईभाड पाडा सुत्रकर फाटा येथे मुंबई वाहिनीवर एका भरधाव अर्टिगा कारने समोरील दुचाकीला धडक दिली. अपघातात सुनील वाडकर, किशोर कांबडी या दोघांचा जागीच तर विक्रम कांबडी या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नाशिक हरसूल बारीमाळ इथे राहणारे हे तरुण संजान येथे कंपनीमध्ये कामाला जात असताना रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

दुचाकीला धडक देणार्‍या कार चालकावर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलासरी पोलीस पुढील तपास करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांचे मृतदेह बाजूला काढून गंभीर जखमी तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जखमी तरूणाचा देखील दुर्दैवी मृत्यु झाला आहे. त्यानंतर तिन्ही मृतदेह तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.