घरपालघरवसईमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे तीन रुग्ण आढळले

वसईमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे तीन रुग्ण आढळले

Subscribe

वसई विरार परिसरात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती उजेडात आली आहे. म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आल्यानंतर वसई विरार महापालिकेने ही बाब गंभीरपणे घेत महापालिकेच्या रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

वसई विरार परिसरात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती उजेडात आली आहे. म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आल्यानंतर वसई विरार महापालिकेने ही बाब गंभीरपणे घेत महापालिकेच्या रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच या आजारावरील औषधे आणि इंजेक्शनही महापालिकेने मागवली आहेत. देशात आणि राज्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच या आजारावर उपचार करताना वापरण्यात येणाऱ्या औषधाचे दुष्परिणाम आता पुढे येऊ लागले आहेत. औषधामुळे थेट डोळ्यांवर आणि इतर अवयवांवर परिणाम होत आहेत. मुंबईमध्ये म्युकरमायकोसिसचे आढळल्यानंतर आता वसई विरार परिसरातील तीन जणांना या रोगाची लागण झाली आहे. वसई येथील दाताचे डॉ. सचिन राठोड यांच्याकडे म्युकरमायकोसिसची लक्षणे असलेले तीन रुग्ण औषधोपचार घेत आहेत. त्यांच्यावर लवकरच ऑपरेशन करण्यात येणार आहे.

काही दिवसापूर्वी माझ्याकडे काही रुग्ण दात दुखत असल्याने आले होते. त्यांच्या ओठ आणि डोळ्याच्या खाली सूज येऊन दुखणे तसेच नाकातून आणि तोंडातून दुर्गंधी येत असल्याच्या त्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांची व्यवस्थित तपासणी केल्यावर आणि चाचणी केल्यावर त्यांना म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्याचे आढळून आली आहेत. त्यांच्यावर औषधोपचार सुरु करण्यात आले असून लवकरच त्यांच्या जबड्याचे ऑपरेशन केले जाणार आहे.
– डॉ. सचिन राठोड, दंतचिकीत्सक

- Advertisement -

कोरोनावरील उपचारादरम्यान स्टेराइड आणि टॉसिलीझूमन या औषधाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात. परंतु त्याचे शरीरावर वेगळे दुष्परिणाम होत असल्याचे दिसू लागले असून बऱ्याच रुग्णांना म्युकरमायकोसिसने गाठले आहे. हा बुरशीजन्य रोग असून मधुमेह असलेल्याना याचा धोका जास्त असल्याचे दिसून आले आहे. वसई विरारला लागून असलेल्या मुंबईमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळू लागले असताना वसईतही तीन जणांना त्याची लागण झाल्याचे उजेडात आले आहे.

म्युकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. मधुमेह झालेल्या आणि कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाला हा आजार लवकर होतो असे आढळून आले आहे. हा आजार होऊ नये म्हणून नागरिकांनीच आपली काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्यातील प्रतिकारशक्ती कशी वाढेल याकडे रुग्णाने लक्ष देण्याची गरज आहे. अशा वातावरणात कोणीही घाबरून जाऊ नये.
– रवींद्र बिजूर, नेत्ररोगतज्ञ

- Advertisement -

हा रोगाचा धोका लक्षात घेऊन वसई विरार महापालिकेने नालासोपारा पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये एक कक्ष तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या आजारावर उपचारासाठी लागणारी इंजक्शन्स आणि औषधे याची ऑर्डर महापालिकेने दिली आहे. त्याचप्रमाणे महापालिका प्रशासनाने हद्दीतील डोळे, दातांचे, नाक, कान, घसा यांचे डॉक्टर आणि मेंदूवरील आजाराचे डॉक्टर यांच्याशी संपर्क साधत आहेत. त्यांच्याच निरीक्षणाखाली रुग्णांवर औषधोपचार कुठे करायचे, उपचारासाठी रुग्णांना कुठे ठेवायचे याचेही नियोजन महापालिकेचे आरोग्य विभाग करू लागले आहे.

कोरोनंतर म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. यावरील उपचारासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. या आजारावरील उपचारासाठी नालासोपारा पश्चिमेला नव्याने तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये एक खास कक्ष तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्याचबरोबर आजारावरील उपचारासाठी इंजक्शन आणि औषधे मागवण्यात असून खरेदीचे कार्यादेश देण्यात आले आहेत.
– किशोर गवस, उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -