घरपालघरमहापालिकेच्या ‘जीआयएस टॅगिंग’ला खिळ?

महापालिकेच्या ‘जीआयएस टॅगिंग’ला खिळ?

Subscribe

मुंबईतील ‘टेरेकॉन’ संस्थेने ही गणना केली होती. त्यावेळी महापालिका क्षेत्रातील वृक्षांची संख्या 14 लाख इतकी होती.

वसई : राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार, वसई-विरार महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाने महापालिका क्षेत्रातील वृक्षांचे ‘जीआयएस टॅगिंग’ (भौगोलिक माहिती प्रणाली) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रक्रिया पार न पडल्यामुळे महापालिकेच्या ‘जीआयएस टॅगिंग’ला खिळ बसली आहे. या धोरणानुसार महापालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना करण्यात येणार होती. तांत्रिक सल्लागाराच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या या कामाकरता निविदा प्रक्रिया करण्यात येणार होती, मात्र याबाबत आजपर्यंत कोणतीही प्रक्रिया पार पडलेली नसल्याची माहिती महापालिकेतून प्राप्त झाली आहे. 2015 साली वसई-विरार महापालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना झाली होती. मुंबईतील ‘टेरेकॉन’ संस्थेने ही गणना केली होती. त्यावेळी महापालिका क्षेत्रातील वृक्षांची संख्या 14 लाख इतकी होती.

त्यानंतर आता 2022 मध्ये पुन्हा एकदा वृक्षगणना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या गणनेत वृक्षाची प्रजाती, नाव, फळजाती, उंची, वय, घेर, रंग, सुवास, वृक्षाची शास्त्रीय माहिती, त्याचा उपयोग आदी वर्गीकरण करण्यात येणार होती. त्यानंतर ही माहिती ‘मोबाईल’ बेस्ड सॉफ्टरवेअरमध्ये एकत्रित करण्यात येणार होती; जेणेकरून या झाडांना कुणी इजा पोहोचवली किंवा या वृक्षांची तोड झाल्यास महापालिकेला याबाबतची माहिती कळू शकणार आहे. याशिवाय या वृक्षगणनेमुळे महापालिका क्षेत्रातील ‘हरित क्षेत्र’ किती आहे, याचीही माहिती महापालिकेला मिळणार आहे. भविष्यात या क्षेत्रात महापालिकेला आणखी वृक्ष लागवड करता येणार आहे. विशेष म्हणजे सरकारच्या नव्या धोरणानुसार या वृक्षांना ‘जीआयएस टॅगिंग’ करण्यात येणार होती. या वृक्षांना नंबरिंग कोड देण्यात येणार असल्याने ‘गुगल’ केल्यास या वृक्षांचा अक्षांश-रेखांश, ठिकाण आणि त्याचे अंतर समजण्यास सोपे जाणार असल्याचे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातून सांगण्यात आले होते. तांत्रिक सल्लागाराच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार होते;

- Advertisement -

मात्र याकरताची निविदा प्रक्रिया रखडल्याने सरकारच्या ‘जीआयएस टॅगिंग’च्या धोरणालाही खिळ बसली आहे.नागरी वनीकरण, माझी वसुंधरा अभियान, वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान या माध्यमातून वसई-विरार महापालिकेने 2021-22 या आर्थिक वर्षात तब्बल एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवले होते. मात्र, महापालिकेचा हा वृक्ष लागवडीचा संकल्प कागदावरच राहिला आहे. वनविभागाच्या 80 हेक्टर जागेवर हे वनीकरण करण्याचा महापालिकेने हा संकल्प सोडला होता. त्याकरीता धानीव, मनवेलपाडा, शिरगाव आणि पेल्हार परिसरातील वनविभागाच्या जागेपैकी वृक्षलागवडी योग्य जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी विनंती महापालिकेने वनविभागाला केली होती. मात्र ही वृक्ष लागवडही केवळ कागदावरच राहिली असल्याची समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -