मोखाडा : डहाणू नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील मोखाडा हद्दीतील तोरंगण घाट पावसाळ्यात जेवढा मनमोहक,निसर्गरम्य आहे.तेवढाच उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात वाहनांसाठी धोकादायक असून वाहनचालक, प्रवाशांसाठी मृर्त्युचा कर्दनकाळ ठरणारा आहे.मागील एक- दोन वर्षांपूर्वी या घाटात अपघात घडून वाहनांना आणि प्रवाशांना जास्तीची इजा होऊ नये, नुकसान होऊ नये यासाठी तत्कालीन मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी धोकादायक वळणावर टाकलेला मातीचा भराव संरक्षण दायी ठरत होता.परंतू मागील महिन्यात या धोकादायक वळणावर दारुच्या ट्रकचा अपघात झाला आणि मातीचा भराव पूर्ण खचून खोल दरी तयार झाली आहे.
एमआयडीसी नाशिक ते तारापूर म्हणा किंवा नाशिक ते गुजरात,पालघर,डहाणू या भागातील मालवाहतूक वाहनांसाठी अगदी सोयीस्कर समजला जाणारा तोरंगण घाटातील रस्त्यांवरुन दररोजची मोठी रेलचेल असते.मात्र घाट रस्त्यावरुन प्रवास करणार्या वाहनांचे चालक हे नवीन असतात किंवा आंबोलीपासून वाहन चालक गाडीचे ब्रेक लावत येतात त्यामुळे तोरंगण घाटात पोहचेपर्यंत गाडीचे ऑईल ब्रेक गरम होऊन फेल होतात आणि नेमका जिथे अपघात घडण्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी तीव्र उतार असल्याने गाडीचे ब्रेक लागत नाहीत आणि अपघात घडत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. रात्री -अपरात्री केव्हाही या धोकादायक वळणावर मोठा अपघात घडून वाहनांसह जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे वेळीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मातीचा भराव टाकून खोल दरी बुजवावी जेणेकरून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.