HomeपालघरTorres Scam: फसव्या टोरेस कंपनीची पाच बँक खाती गोठवली

Torres Scam: फसव्या टोरेस कंपनीची पाच बँक खाती गोठवली

Subscribe

सध्या फिर्यादी व साक्षीदार यांची एकूण ६८ लाख ११ हजार ७३३ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली आहे.

भाईंदर :– भाईंदरमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणार्‍या टोरेस कंपनीविरोधात नवघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ५२ जणांचे तक्रार अर्ज पोलिसांकडे आले असून दोन दिवसांत पोलिसांनी फसव्या टोरेस कंपनीची एकूण ८ कोटी ७७ लाख रुपये रक्कम जमा असलेली बँक खाती गोठवली असल्याची माहिती मिळत आहे. नवघर पोलीस पाहिजे आरोपीतांचा शोध घेत आहेत. टोरेस नावाच्या ज्वेलरी शॉपमध्ये अन्य नागरिकांनी गुंतवणुक केली असल्यास नवघर पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन नवघर पोलिसांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. नवघर पोलीस ठाण्याचे हद्दीत अनंता एक्झोरिया बिल्डिंग रामदेव पार्क येथे टोरेस नावाचे ज्वेलरीचे दुकान भाड्याने घेण्यात आले होते. भाईंदर, मीरारोड, नयानगर, काशिमीरा आणि इतर परिसरातील नागरिकांना विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सांगून मोजोनाईट स्टोन खरेदी केल्यास ९ टक्के बोनस व चांदीचे दागिने खरेदी केल्यास ४ टक्के, सोन्याचे दागिने खरेदी केल्यास २ टक्के गुंतवणुकीवर दर आठवड्याला बोनस म्हणून परतावा देण्याची आमिषे देण्यात आली होती.त्यानंतर अचानक दुकान बंद झाल्याने गुंतवणूक दारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात पहिल्या दिवशी ३० ते ३५ जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र दुसर्‍या दिवशी जवळपास १७ जणांनी तक्रार अर्ज दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या फिर्यादी व साक्षीदार यांची एकूण ६८ लाख ११ हजार ७३३ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली आहे.

त्यानंतर तात्काळ पोलिसांनी कंपनीच्या विविध बँक खात्यांची तपासणी केली असता, एका खात्यात १ कोटी ७७ लाख रुपये तर दुसर्‍या खात्यात ७ कोटी असल्याचे आढळून आले होते. ही रक्कम कंपनीकडून इतरत्र वळवली जाऊ नये किंवा ती काढून घेतली जाऊ नये, म्हणून पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची माहिती बँकांना देत दोन्ही खाती गोठवली आहेत. सदरील गुन्हयाचा तपास मीरा भाईंदर परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी हे करत आहेत.