भाईंदर : भाईंदरमध्ये टोरेस घोटाळ्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एक मालाड येथून मॅनेजर, मीरारोडमधून कॅशिअर आणि महिला दुकान मालक यांना मुंबई ताडदेव येथून अटक करण्यात आली आहे. तर त्या तिघांकडून २६ लाख २० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत ४०० हून अधिक तक्रारी नवघर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या आहेत. तर त्यापैकी ९५ तक्रारदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. लक्ष्मी सुरेश यादव, (वय २३ वर्ष), नितीन लखवाणी (वय ४७ वर्ष मॅनेजर रा. मालाड पश्चिम),मोहम्मद मोईजिद्दीन खालिद शेख (वय ५० वर्ष रा. मीरारोड) यांना अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असणार्या टोरेस कार्यालयात गुरुवारी दुपारी पंचनामा करण्यात आला होता.यावेळी मीरा- भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. आतापर्यंत एकूण ९५ जणांची १ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित ३०० फसवणूक झालेले तक्रारदारांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. आतापर्यंत पोलिसांनी दोन बँक खाती गोठवत ९ कोटी रुपये गोठवले आहेत. तसेच कोणत्याही प्रकारच्या खोट्या स्कीम आणि जाहिरातीवर विश्वास ठेवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, असे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे. सदरील गुन्ह्याचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी हे करत आहेत.