ग्रामीण भागात पारंपरिक गावदेव पुजेला सुरुवात

आदिवासी बांधव गावदेवाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचून-गाऊन नाचगाण्याचा मनसोक्त आनंद घेतात.

डहाणू : आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पारंपरिक गावदेव पुजेला सुरुवात झाली आहे. पूर्वापारपासून आदिवासी बांधव गावाचा रक्षक म्हणून गाववेशीवरील गावदेवाची पूजा करत आले आहे. गावदेव मंदिरात वाघोबा देवाची पूजा केली जाते. वाघोबा देवाला सर्व गावाचा रक्षक मानले जाते म्हणून त्याला गावदेव म्हणतात.
पुजेचा कार्यक्रम सलग तीन दिवस चालतो तिसर्‍या दिवशी देवाला नैवेद्य देऊन सर्व गावात प्रसाद वाटला जातो. तसेच दर पाच वर्षांनी एकदा पुजेदरम्यान गावाच्या वेशीवर तोरण बांधले जाते त्यादिवशी गावातील घरे आणि बाजारपेठ बंद ठेऊन, सर्व कुटुंब आपल्या परिवारासोबत पहाटे-पहाटे आपले बिर्‍हाड घेऊन गावाच्या वेशीबाहेर किंवा जंगलात जातात व तेथेच दुपारचे जेवण बनवून जेवण करून संध्याकाळी सहा-सात वाजेदरम्यान गावाच्या वेशीवर जे तोरण बांधले जाते. त्या तोरणाच्या खालूनच गावात प्रवेश करत असतात. तशी परंपरा शेकडो वर्षांपासून गावागावात जपली जाते आहे.
वाडवडिलांपासून ही प्रथा अजूनही त्याच पद्धतीने आणि उत्साहाने साजरी करण्यात येते. पुजेदरम्यान गावातील सर्व पुरुष गावदेवाच्या मंदिरात पुजेसाठी एकत्र येत असतात. पुजेदरम्यान गावात चैत्यन्याचे वातावरण अनुभवायला मिळते.
आदिवासी बांधव पारंपरिक वाद्य वाजवून त्यावर गाणी गाऊन नाचून आपला आनंद व्यक्त करतात. काही गावांमध्ये गावदेव पुजेनिमित्त यात्रा भरवल्या जातात. यात्रेत पंचक्रोशीतील आदिवासी बांधव गावदेवाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचून-गाऊन नाचगाण्याचा मनसोक्त आनंद घेतात.

गावदेव पुजेदरम्यान गावातील वाड-वडील, तरुणवर्ग आवर्जून उपस्थिती दर्शवतात. गावात काही नवीन नियम लावणे, गावातील दोन पक्षांतील वाद-विवाद सोडवणे, या व्यतिरिक्त इतर काही प्रश्न असतील तर ते सर्वांच्या समक्ष सर्वानुमते सोडवले जातात. हा न्याय करताना सर्वांना आपले मत व्यक्त करण्याची अभिव्यक्ती असते. एकूणच पुजेदरम्यान गावात सामाजिक बांधिलकी जपली जाते.
– सुरज भगली, ग्रामस्थ