पालघर: चक्रीवादळाचा तडाखा बसल्यास किनारपट्टीवरील लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांना सुरक्षितस्थळी नेण्याबाबतीतचे प्रशिक्षण(मॉक ड्रिल)शिबिर शिरगावच्या किनार्यावर गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले. तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील नागरिकांसोबत अनेक शासकीय विभागांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी गटविकास अधिकारी रेवंडकर, नायब तहसीलदार डॉ.नरेंद्र माने, प्रशांत सांगळे, सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रेमनाथ ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.तन्वीर शेख, शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच घनश्याम मोरे, सातपाटी ग्रामपंचायतीचे सरपंच सीमा भोईर, ग्रामविकास अधिकारी आर एल पाटील, विपीन संखे, मंडळ अधिकारी मनोहर वसावे, मनीष वर्तक, राजेंद्र पाटील, अनिल वायाळ आदी सह अनेक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शिरगाव येथील नागरिकांनीही या तालमीत आपला सहभाग नोंदवून आम्ही एखाद्या आपत्ती निवारणसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर तोक्ते, बिपर जॉय, निसर्ग आदी अनेक चक्री वादळे घोंगावत किनारपट्टीला उध्वस्त करीत तर कधी धडका देत असल्याच्या घटना नेहमीच घडत आल्या आहेत. ३ वर्षांपूर्वी तलासरी, डहाणू सह केळवे, माहीम-टेंभी गावाला धडक दिल्यावर केळवे येथील सुरू बाग किनारा उध्वस्त करीत टेंभी येथील एका मच्छीमारांची बोट २०-२५ फूट उंच उडवून तिचा चक्काचूर केला होता. यात एका मच्छीमारांचा मृत्यू होत अनेक बागायती उध्वस्त होऊन पाच दिवस विद्युत प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे देशात अवकाळी पावसासह चक्रीवादळाच्या घटना वाढीस लागल्याने सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीवरील नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घेत उपाययोजना हाती घेतल्या होत्या.