भाईंदर : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता काळात मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयातील ३८ अधिकार्यांच्या ३० ऑक्टोबर रोजी बदल्या केल्या होत्या. त्यात विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना आयुक्तालय हे ठाणे आणि पालघर जिल्हा एकत्रीकरण असल्याने त्याचा फटका बसत बदल्या केल्या होत्या. त्यापैकी आता ७ पोलीस अधिकार्यांची पुन्हा आयुक्तालयात नियुक्ती केली गेली आहे. तसे आदेश अपर पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी ३१ डिसेंबर रोजी निर्गमित केले आहेत. त्यानुसार त्यांना पुन्हा ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते, तिथे त्यांना नियुक्ती दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मीरा भाईंदर – वसई विरार आयुक्तालयातून मुंबईत बदली झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, जितेंद्र वनकोटी, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत सरोदे, विलास सुपे यांची आणि पोलीस निरीक्षक दिलीप राख , सुधीर गवळी या ७ पोलीस निरीक्षकांची पुन्हा बदली करून घर वापसी केली गेली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयात ३ वर्षां पेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकार्यांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने ३१ जुलै आणि २८ सप्टेंबर २०२४ रोजी दिले होते. १५ ऑक्टोबरपासून आचार संहिता सुरु झाल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाने बदलीस पात्र पोलीस अधिकार्यांची यादी मागवली होती. त्यात त्यांनी ती माहिती पोलीस महासंचालकांना सादर केली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तालयातील ३८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या गेल्या होत्या. २ नोव्हेंबर रोजी मुंबई व अन्य भागातील ३६ अधिकार्यांची नियुक्ती पोलीस आयुक्तालयात केली गेली होती. उपायुक्त मुख्यालय यांच्या आदेशात नव्याने हजर झालेल्या पोलीस अधिकार्यांपैकी तुळींज वगळता एकही पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक वा प्रभारी म्हणून नियुक्तीच केली गेली नव्हती, सदर अधिकार्यांच्या नियुक्त्या या तात्पुरत्या असल्याचे नमूद केले होते.