बनावट अंड्यांच्या ट्रेमागून मद्य वाहतूक

जप्त केलेल्या मद्य साठ्याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता मद्य साठा गुजरात राज्यातील कैलासभाईचा असल्याची माहिती दिली.

मनोर: बनावट दारूची वाहतूक करताना आरोपी कशाचा अवलंब करतील याचा नेम नसतो.याचेच प्रत्यंतर मनोर वाडा रस्त्यावरील वाघोटे टोलनाका परिसरात दमण बनावटीच्या दारूची वाहतूक करताना करण्यात आलेल्या कारवाईनंतर आला. कारण पिकअप टेम्पोमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचार्‍यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने टॅम्पोमध्ये बनावट प्लास्टिकच्या अंड्यांचे ट्रे ठेवण्यात आले होते. माहितीच्या अनुषंगाने कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी सकाळी वाघोटे टोलनाका भागात नाकाबंदी लावली होती. अंड्याचे ट्रे हटवून पीक अप टेम्पोची झडती घेतली असता टेंपोमध्ये दमण बनावटीची दारू लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. जप्त केलेल्या मद्य साठ्याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता मद्य साठा गुजरात राज्यातील कैलासभाईचा असल्याची माहिती दिली.

टेम्पो चालकाला अटक करण्यात आले असून कैलासभाई याला फरार घोषित करून दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 81, 83 आणि 98 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी टेम्पो चालक कमलेश बिश्नोई याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची उत्पादन शुल्क कस्टडी सुनावली आहे. कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक,बाबासाहेब भूतकर ,भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर आणि भरारी पथकातील सर्वांनी केली आहे.