घरपालघरजंगली झाडांच्या फुले, बियांपासून आदिवासींना रोजगार

जंगली झाडांच्या फुले, बियांपासून आदिवासींना रोजगार

Subscribe

भौगोलिकदृष्ठ्या जव्हार तालुका हा नदी, डोंगर-उतार, दर्‍याच्या भागाने बनलेले क्षेत्रफळ आहे. या भागातील जंगलात अनेक औषधी वनस्पती, झाडे व वनौपज संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

भौगोलिकदृष्ठ्या जव्हार तालुका हा नदी, डोंगर-उतार, दर्‍याच्या भागाने बनलेले क्षेत्रफळ आहे. या भागातील जंगलात अनेक औषधी वनस्पती, झाडे व वनौपज संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ती गोळा करून या भागातील आदिवासी शेतमजूर जीवनावश्यक वस्तूंच्या बदल्यात किंवा पैसे घेऊन विक्री करत आहेत.

जंगलातील काही झाडांपासून मिळणार्‍या फळे, फुले व बिया या येथील आदिवासींना वरदान ठरत असून या जंगली रानमेव्याची विक्री करून एक चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेषतः शहरात व्यापार्‍यांकडून वस्तू विनिमय पद्धतीने या रानमेव्याची खरेदी होत असल्याने या माध्यमातून आदिवासींना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत आहेत.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल संपत्ती आहे. या जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू व वाडा हे तालुके आदिवासी बहुल तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातील जंगल भागात राहणारी शेकडो आदिवासी कुटुंबे ही जंगलातून विविध झाडांपासून मिळणारी फळे, फुले व बी विकून आपला संसारगाडा चालवतात.

जंगलातील साग, निलगिरी, अकेशिया, काजू, गुंज, मोह, चिंच, करंज, सिताफळ, डिंक, सागरगोटे, रिठा, बावा आदी जंगली झाडांच्या बिया तसेच सुकविलेली मोहफुले व तेलबिया यांची विक्री करून रोजगार मिळवित आहेत.

- Advertisement -

जंगली झाडे व अन्य वन औषधी वनस्पती यांच्या बियांना शहरी भागात खुप मागणी आहे. तसेच विविध जंगली झाडांची रोपवाटिकेचा व्यवसाय करणार्‍यांकडून या बियानांची विशेष खरेदी केली जाते. विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्याच्या ठिकाणी भरणार्‍या आठवडा बाजारात ही जंगली झाडांची बियाणे, फुले खरेदी करण्यासाठी खास व्यापारी येतात.

आठवडा बाजारात येणार्‍या व्यापार्‍यांकडून जंगली वनस्पतींचे बियाणे खरेदी केले जाते. त्या बदल्यात व्यापारी मिरची पावडर, डाळी, कांदा, बटाटा तसेच संसार उपयोगी भांडी देतात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार होत नाही. वस्तूंच्या बदल्यात वस्तूच दिली जाते.
– सोमा भोये, रानमेवा संकलक

जंगली वनस्पतींची काही फुले, बिया या नाशवंत असल्याने त्यांची योग्य साठवण केली. तरच फायदेशीर ठरते. शिवाय येथील आदिवासींनी जंगलातून गोळा केलेल्या विविध वनस्पतींच्या बिया, फुले यांची खरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून झाल्यास आदिवासींना अधिक किंमत (दर) मिळेल. त्यापासून एक शाश्वत रोजगार उपलब्ध होईल.
– सुदाम पारधी, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -