जव्हार शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास

त्यावेळी घाबरलेल्या वाहन चालकांकडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी भुंकून हैराण करीत असलेल्या कुत्र्यांपासून वयोवृद्धांसह नागरिक भयभीत होत आहेत. काही कुत्रे तर लहान विद्यार्थ्यांना लक्ष्य करीत असून नागरिकांच्याही अंगावर धावून जात असतात.

जव्हार: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून ते मुक्त संचार करीत सर्वत्र हैदोस घालीत आहेत. त्यांच्या दहशतीने लहान मुले, वयोवृद्ध नागरिक तसेच विद्यार्थ्यांसह पालकही भयभीत झाले आहेत.
एका कुत्र्याने गुरुवार रोजी एका ४२ वर्षीय व्यक्ती व एका लहान मुलावर जीवघेणा हल्ला केला असून जव्हार नगर परिषदेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.शहरात काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून बहुतेक कुत्र्यांना संसर्गजन्य रोग झाला आहे. हे कुत्रे एस.टी. स्थानक, मच्छी व मटण मार्केट, पोस्ट कार्यालय, गांधीचौक,परिसरासह चौका-चौकात कळपाने भटकताना दिसतात. रस्त्याने येणारे विद्यार्थी, वाटसरु, चारचाकी वाहने तसेच मोटारसायकलस्वाराच्या अंगावर भुंकत धावून जातात. त्यावेळी घाबरलेल्या वाहन चालकांकडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी भुंकून हैराण करीत असलेल्या कुत्र्यांपासून वयोवृद्धांसह नागरिक भयभीत होत आहेत. काही कुत्रे तर लहान विद्यार्थ्यांना लक्ष्य करीत असून नागरिकांच्याही अंगावर धावून जात असतात.

कुत्र्यांना संसर्गजन्य रोग झाल्याने त्याच्या वासाने नागरिक बेजार झाले आहेत. रात्री व पहाटेच्या वेळी बहुतेक नागरिक फिरायला जात असतात. ते कुत्र्यांच्या भीतीने जीव मुठीत घेवून फिरत असल्याचे चित्र बहुतांशी दिसत असते. त्याचप्रमाणे शहरातून सकाळी लवकर शाळा कॉलेजला जाणारी बरीच लहान व मोठी मुले शाळेत जाताना त्यांना देखील या भटक्या कुत्र्यांची भीती वाटत आहे.

**कारवाईची गरज**
जव्हार शहरातील मोकाट ,त्याच बरोबर व्याधी झालेल्या कुत्र्यांपासून एखादा मोठा अनर्थ होण्याअगोदरच त्यांचा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दुचाकी स्वारांच्या अंगावर देखील हे मोकाट कुत्रे धावून जात असल्याने गंभीर परिस्थिती येथे उद्भवू शकते.