भाईंदर :- आपल्या जुन्या मित्रावर ठेवलेल्या विश्वासामुळे एकाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आपण अडचणीत असल्याचे सांगून मयत व्यक्तीच्या घरावर त्याच्या मित्राने २५ लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. परंतु, त्याची संपूर्ण रक्कम काढून घेत त्याचे हप्ते न-भरल्याने त्या रूमवर जप्तीची कारवाई आली होती. अखेर मयताने अंगावर सॅनिटायजर ओतून घेत आत्महत्या केली होती.याबाबत नवघर पोलीस ठाण्यात मयतांच्या पत्नीच्या तक्रारींवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पूर्वेला नवघर रोड येथे राहणार्या मयत गिरीधर सोलंकी यांच्या मालकीच्या फ्लॅटवर त्यांचे जुने मित्र चंद्रकांत गलाटे वय ५८ वर्ष यांनी त्यांचा विश्वास संपादन करून २०१५ साली २५ लाखांचे कर्ज काढले होते. त्यांनी पहिले पाच ते सहा हप्ते सुरळीत भरले. मात्र त्यानंतर त्यांनी हप्ते भरले नाहीत. तसेच शेवटी शेवटी फोन उचलणेही बंद केले. तेव्हा शेवटी बँकेने ती सदनिका १० ऑगस्ट २०२३ रोजी जप्त करण्याची शेवटची नोटीस दिली. त्याआधीच सोलंकी यांनी ८ ऑगस्ट रोजी घरातील सॅनिटायजर अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते ४६ टक्के भाजले होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते.अखेर उपचारा दरम्यान २५ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून तो गुन्हा नवघर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिसांनी सदरील आरोपीला तातडीने अटक करत त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन उबाळे हे करत आहेत.