वसईः रस्त्यावर पायी चाललेल्या लोकांना बोलण्यात गुंतवून ठेवून हातचलाखीने त्यांना लुटणार्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आठ गुन्ह्यांची उकल केली असून चोरी केलेले १० लाख रुपये किंमतीचे १६६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. रमेश ऊर्फ रम्या विजयकुमार जैसवाल (४६) आणि विशाल ऊर्फ बल्ला ऊर्फ बाळू विष्णू कश्यप (२८) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विरार येथील साईनाथ नगरच्या प्लाझा इमारतीत राहणारे रामचंद्र कृष्ण बिरंगोळे (६५) १८ ऑगस्टला सकाळी फुलपाडा येथील साईबाबा मंदिरासमोर उभे होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना ’तुम्ही चहा पिता का’ असे विचारून व पाया पडून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी काढून घेतली होती. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारचे फसवणुकीचे इतर गुन्हेही अन्य पोलीस ठाण्यांत नोंदवलेले होते.
या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनकडून सुरू होता. गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण व माहिती प्राप्त करून, पोलिसांनी रमेश जैसवाल आणि विशाल कश्यप या दोघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता, मुंबई तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील आठ गुन्ह्यांची उकल झाली. तसेच फसवणूक केलेले १० लाख रुपये किंमतीचे १६६ ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. इतर शहरांतही या दोघांवर ५० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांची उकल पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, साहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, अभिजीत टेलर आणि त्यांच्या पथकाने केली आहे.