घरपालघरवाड्यात सफाईसाठी टँकमध्ये उतरलेल्या 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू

वाड्यात सफाईसाठी टँकमध्ये उतरलेल्या 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू

Subscribe

तालुक्यातील बिलोशी गावच्या हद्दीतील महिंद्रा रोझीन अ‍ॅण्ड टर्पेन्टाईन या कंपनीतील टँकची सफाई करण्यासाठी आत उतरलेल्या 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेनंतर प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करीत कामगारांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

सचिन बाळकृष्ण भोईर (रा. बिलोशी) आणि किशोर यशवंत फरले (रा. गोर्‍हे) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास वाडा पोलीस करीत आहेत. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याने कंपनी मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केली आहे.

- Advertisement -

बिलोशी गावाच्या हद्दीत महिंद्रा रोझीन अ‍ॅण्ड टर्पेन्टाईन ही रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतील टँक साफ करण्यासाठी मंगळवारी रात्री एक कामगार उतरला होता. आतील रसायनाच्या वासामुळे तो गुदमरल्याने आरडाओरडा करू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार टँकमध्ये उतरल्याने तोही गुदमरल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. कंपनीने कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने या कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कंपनीची सखोल चौकशी करून प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसानभरपाईची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -