पालघर जिल्ह्यातील दुचाकी रुग्णवाहिका सेवा ठप्प

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात चारचाकी गाडी पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी प्रथोमाचार देण्यासाठी असलेल्या १०८ क्रमांकावरील दुचाकी रुग्णवाहिका वेळेवर सेवा देत नसल्याने रुग्णाचे मोठे हाल होत आहेत.

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात चारचाकी गाडी पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी प्रथोमाचार देण्यासाठी असलेल्या १०८ क्रमांकावरील दुचाकी रुग्णवाहिका वेळेवर सेवा देत नसल्याने रुग्णाचे मोठे हाल होत आहेत. ५ पैकी केवळ चार रुग्णवाहिका कार्यरत असतानाही सर्व रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे जिल्हा व्यवस्थापक विभागाडून सांगितले जात आहे. पण फोन करूनही या रुग्णवाहिका येत नसल्याची तक्रार मात्र नागरिक करत आहेत. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील गाव पाडे अजूनही रस्त्याने जोडलेले नाहीत. त्यामुळे त्या भागात चारचाकी वाहन पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी रुग्णांना चार-पाच किलोमीटरची पायपीट करून गावाबाहेरील रस्त्यापर्यंत जावे लागते. त्यामुळे गंभीर रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यातून दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आरोग्य सुविधेची बाब विचारात घेऊन पाच बाईक रुग्णवाहिका दिल्या होत्या. परंतु या रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होत नसतील, तर याचा जिल्हा प्रशासनाने शोध घेऊन तात्काळ चौकशी करणे गरजेचे आहे.
– प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य, पालघर

मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूती कळा आल्याने नातेवाईकांनी १०८ वर फोन करून रुग्णवाहिका मागवली होती. पण रुग्णवाहिका आलीच नसल्याने या महिलेला डोली करून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी दुचाकी रुग्णवाहिका पोचवली असती, तर या महिलेला प्रथोमाचार देता आले असते. पण ही रुग्णवाहिका आलीच नाही. मोखाडा येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी माहिती दिली की, १०८ जिल्हा व्यवस्थापक विभाग खोटी माहिती देत आहे. जव्हार, मोखाडा, या परिसरात एकही दुचाकी रुग्ण वाहिका नाहीत. तर ज्या चारचाकी रुग्णवाहिका आहेत. त्यासुद्धा वेळेवर येत नाहीत. यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागत आहे.

तर जिल्हा १०८ रुग्णवाहिका सहायक जिल्हा व्यवस्थापक अधिकारी अमित वडे यांनी माहिती दिली की, जिल्ह्याच्या सेवेत ५ दुचाकी रुग्णवाहिका असून सर्व कार्यरत आहेत. यातील गांजाळ प्राथमिक आरोग्य केंद्र डहाणू, मालावडा प्राथमिक आरोग्य केंद्र विक्रमगड, नानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र जव्हार, मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र पालघर, परळी प्राथमिक आरोग्य केंद्र वाडा या ठिकाणी या दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत असल्याची माहिती दिली. जव्हारचे अधिकारी वैभव घुले यांनी सांगितले की, केवळ चारच दुचाकी कार्यरत आहेत. तर जिल्हा शल्य चिकित्सक संजय बोदाडे यांनी माहिती दिली की, एकही दुचाकी रुग्णवाहिका जिल्ह्यात नाही. तर ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा रुग्णवाहिका कार्यरत नसल्याचे सांगत आहेत. यामुळे या रुग्णवाहिका नेमक्या कुठे आणि काय करतात?, याचा कोणताही पत्ता लागत नाही.

हेही वाचा –

नाना पटोलेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार, आता अजितदादा म्हणतात…