भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे हे आले होते. तेव्हा, बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना घेरलं आणि प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच, तावडेंजवळ काही डायऱ्याही सापडल्याचा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. याच प्रकरणावर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे हे तुळजापूर दौऱ्यावर होते. आईतुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “खोकासूर आणि भ्रष्टाचाराची राजवट संपवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी, अशी राजवट येऊदे, असं साकडे तुळजाभवानीला घातलं आहे. आई तुळजाभवानी पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही.”
हेही वाचा : “तावडेंचे 25 फोन, माफ करा, मला जाऊद्या, मात्र…”, हितेंद्र ठाकूर आक्रमक
“तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना सुद्धा माझी बॅग तपासण्यात आली. बॅगेत काही सापडलं नाही. मात्र, विनोद तावडे यांच्या बॅगेत पैसे सापडल्याचं मला कळलं. अनिल देशमुख यांच्यावर देखील हल्ला झाला. हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं? ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपवून टाका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
हेही वाचा : तुमची मते किती? हे घे 4 हजार रूपये, धक्कादायक VIDEO समोर; दानवेंचा शिंदे गटातील आमदारावर आरोप
भाजपच्या नेत्याला पकडून द्यावं म्हणून भाजपमध्येच कारस्थान….
“निवडणूक आयोग निपक्ष असता तर कार्यकर्त्यांनी केलेली कारवाई त्यांनी केली असती. नाशिक, मुंबई आणि महाराष्ट्रात पैसे पकडले जात आहेत. भाजपच्या नेत्याला पकडून द्यावं म्हणून भाजपमध्येच कारस्थान झालं आहे. भाजपकडे किती पैसे आहेत? कसे वाटत आहेत? हे स्पष्ट झालं आहे. भाजपमधील बहुजन समाजातील नेतृत्त्व असित्त्वात राहू नये, म्हणून हा खेळ झाला असावा, असं मला वाटतं. तावडेंकडे 15 कोटींपेक्षा अधिक रक्कम होती. त्यातील 5 कोटी क्षितिज ठाकूर यांच्याकडे आहे,” असं शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.