घरपालघरभाववाढीच्या ठसक्यापेक्षा लाकूड फाट्याचा धूर बरा; दरवाढीने उज्वला गॅस योजना फेल

भाववाढीच्या ठसक्यापेक्षा लाकूड फाट्याचा धूर बरा; दरवाढीने उज्वला गॅस योजना फेल

Subscribe

केंद्र शासनाच्या उज्वला गॅस योजनेकरता जव्हार तालुक्यात आदिवासी ग्रामीण भागातील महिलांनी भर उन्हात रांग लावून हा लाभ घेतला. लाभ घेताना चेहऱ्यावर हसू तर येत होते.

केंद्र शासनाच्या उज्वला गॅस योजनेकरता जव्हार तालुक्यात आदिवासी ग्रामीण भागातील महिलांनी भर उन्हात रांग लावून हा लाभ घेतला. लाभ घेताना चेहऱ्यावर हसू तर येत होते. परंतु सध्या जी दरवाढ केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्या दरवाढीचा ठसका हा लाकूड फाट्याच्या धुरापेक्षा अधिक असल्याने लाकूड फाट्याचा धूर अधिक जवळ वाटतो, असे तीव्र पडसाद तालुक्याच्या ग्रामीण भागातून उमटत आहेत. केंद्र सरकारकडून आम्हा गोरगरिबांना गॅस मिळाले. पण गॅसच्या किमती आवाक्याबाहेर वाढल्याने हा आनंद आता शोकात बुडाला आहे. आमच्या नशिबी पुन्हा चूल आणि डोळ्यात अश्रू आणणारा धुरच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागातील आदिवासी महिला व्यक्त करताना दिसत आहेत.

उज्ज्वला गॅस योजनेतून घरात गॅस आला. योजनेतून वस्तू मिळाल्याने अधिकच आनंद झाला. परंतु केंद्र सरकारने गॅसच्या दरात ज्यादा वाढ केल्याने गॅस विकायची वेळ आली आहे. आता चुलीचा धुरच परवडणार आहे.
– योगिता सातपुते, लाभार्थी

- Advertisement -

ग्रामीण भागातील महिलांना दररोज चुलीवर कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकासाठी पहाटे लवकर उठून रोजगाराला जाण्याऐवजी आता जंगलाची वाट धरावी लागत आहे. जंगलात काट्याकुट्यात हात घालून सरपण जमा करून, दुपारपर्यंत घरी येऊन दोन घास खाऊन काम शोधावे लागत आहे. काम केले तरच मीठ-मिरचीला दोन पैसे मिळतात. महागाईने त्रस्त केल्यामुळेच हे सारे करावे लागत आहे, असे जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागातील काही महिलांनी बोलताना सांगितले.

उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस भरणे कठीण झाले असल्याने आमच्यासारख्या लाभार्थ्यांना कमी खर्चात अथवा मोफत गॅस भरून मिळायला पाहिजे. तरच योजना आमच्यासाठी फायद्याची ठरेल.
– रंजना कामडी, लाभार्थी

- Advertisement -

तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोरगरिबांना मिळणाऱ्या स्वस्तातील गॅसमुळे आनंद झाला होता. त्यांना कामावर जाण्यासाठी भरपूर वेळही मिळत होता. त्यामुळे चांगली मजुरी मिळून साधारण खर्च भागायचा. मात्र आता गॅसच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने गॅसचा रिकामा बाटला कोपऱ्यात पडला आहे. दरम्यान, सरपण गोळा करण्यात आणि चुलीच्या धुरामुळे जीवाचे हाल होतात, अशी खंत व्यक्त केली जात आहे.

रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन स्वयंपाक करावा लागतो, भाकरी बांधून घेऊन जावी लागते. दिवसभर थकून सकाळी पहाटे उठून चुलीसाठी सरपण गोळा करायला जावे लागते. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने काहीतरी व्यवस्था करून परवड थांबवावी.
– हर्षला मुकणे, लाभार्थी

हेही वाचा –

WHO : कोरोना लस आणि कर्णबधीरपणाचा काय संबंध ? WHO च्या अभ्यासाला सुरूवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -