घरपालघरसरावलीत सरकारी जागांवर अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

सरावलीत सरकारी जागांवर अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

Subscribe

अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत नसल्याने चिमुकल्या मुलांचे वर्ग नाईलाजाने धोकादायक इमारतीत आणि खासगी भाड्याच्या जागेत भरवले जात असल्याने चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत घेऊन अभ्यासाचे प्राथमिक धडे गिरवत आहेत.

बोईसर : बोईसरलगत सरावली ग्रामपंचायत क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा अक्षरक्ष: सुळसुळाट झाला आहे. सरकारी आणि गुरेचरण जागांवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत असताना अंगणवाडी इमारतीसाठी मात्र जागा मिळणे मुश्किल झाले आहे. अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत नसल्याने चिमुकल्या मुलांचे वर्ग नाईलाजाने धोकादायक इमारतीत आणि खासगी भाड्याच्या जागेत भरवले जात असल्याने चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत घेऊन अभ्यासाचे प्राथमिक धडे गिरवत आहेत.

तारापूर एमआयडीसीमुळे बोईसर आणि लगतच्या परिसरात प्रचंड वेगाने नागरीकरण झाले आहे. लाखो कामगारांना राहण्यासाठी मर्यादित निवारा उपलब्ध असल्याने नजीकच्या सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर, संजयनगर, आझाद नगर, सिद्धार्थ नगर, शुक्ला कंपाऊंड या भागातील महाराष्ट्र सरकारच्या शासकीय आणि गुरचरण जागांवर भुमाफियांनी अवैध कब्जा करून त्या जागा हडप केल्या आहेत. अवैध कब्जा केलेल्या या जागांवर भूमाफियांनी शेकडो अनधिकृत चाळी आणि गोदामे उभारली आहेत. या भागात अनधिकृत बांधकामे सतत वाढत असताना स्वतंत्र्य अंगणवाडी इमारतीसाठी मात्र सरकारी जागा मिळेनासी झाली आहे. सरावली, माच्छीपाडा, वाल्मीकीनगर, शुक्ला कंपाऊंड, संजयनगर, धोडीपूजा, भगवान नगर, सिद्धार्थ नगर आणि अवधनगरपैकी ३ अंगणवाडी केंद्रे ही खासगी जागेत सुरू असून इतर ६ केंद्रे ही जवळच्याच जिल्हापरिषद शाळेत तात्पुरत्या स्वरूपात भरविली जात आहेत. ज्या खासगी जागेत अंगणवाडी केंद्रे सुरू आहेत त्या जागा देखील धोकादायक असून अत्यंत कोंदट आणि दाटीवाटीने लहान मुले शिक्षण घेत आहेत. सरावली ग्रामपंचायतीने संजय नगर आणि सिद्धार्थ नगर येथे असलेल्या सरकारी जागेपैकी काही जागा अंगणवाडी इमारतींसाठी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली असून त्यावर अजून कोणतीच हालचाल दिसत नाही.

- Advertisement -

एकीकडे सरकारी जागेवर अवैध कब्जा करीत अनधिकृत इमारती, चाळी आणि गोदामे फोफावत असताना ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या सुस्त कारभारामुळे सरकारी जागा भूमाफियांच्या घशात सहज जात आहेत. बोईसर मंडळ अधिकारी आणि तलाठी सजा बोईसर, सरावली, बेटेगाव यांच्या डोळ्यांदेखत अनधिकृत बांधकामे प्रचंड वाढत असल्याने परिसराला बकाल रूप येऊन नागरी सुविधा पुरविताना स्थानिक ग्रामपंचायतींची पुरती दमछाक होत आहे तर दुसरीकडे मात्र लहान मुलांना घडविण्यात महत्वाची भूमिका असलेल्या अंगणवाडीसाठी मात्र जागा मिळत नसल्याने सरकारची नेमकी प्राथमिकता कशाला हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरावली ग्रामपंचायत अंतर्गत संजय नगर,सिद्धार्थ नगर येथील अंगणवाडीसाठी स्वतंत्र्य इमारत नसल्याने त्या जि.प.शाळेत आणि भाड्याच्या खासगी जागेत तात्पुरत्या स्वरुपात भरविल्या जात आहेत.या जागा देखील धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून स्वतंत्र्य अंगणवाडी इमारतीसाठी सरकारी जागा मिळावी यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
– पूर्णिमा प्रकाश धोडी
जि. प. सदस्या, पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -