घरपालघरमहापालिका, वाहतूक पोलिसांकडूनच अनधिकृत पार्किंगला उत्तेजन

महापालिका, वाहतूक पोलिसांकडूनच अनधिकृत पार्किंगला उत्तेजन

Subscribe

सध्या हा स्कायवॉक भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा आसरा झाला आहे. तर स्कायवॉकखालील रस्ता दुकानदार आणि फेरीवाल्यांना आंदण दिलेला आहे.

वसईः वाहनतळ व वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करताच वाहतूक पोलिसांकडून सामान्य वाहनधारकांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे. आधी शहरात आवश्यक त्या सोयीसुविधांची निर्मिती करा मगच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कारवाई करा, असा सल्ला शिवसेना जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी दिला आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत शहर नियोजनाचा बोजवारा उडालेला आहे. सरकारी इमारती आणि अन्य जागांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे रस्ते आक्रसलेले आहेत. महापालिका मुख्यालय, पोलीस प्रशासन इमारत, तलाठी कार्यालय, मासळी मार्केट , महापालिकेचा परिवहन बस आगार भररस्त्यात उभारला गेलेला आहे. त्यामुळे या इमारतींखालून व शेजारून गेलेले रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेने बंद केलेले आहेत. शहरातील रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहे. विरार पश्चिमेला आधीच चिंचोळ्या असलेल्या जागेत ‘स्कायवॉक बांधून पालिकेने आपल्या अकलेचे दिवाळे तोडलेले आहे. सध्या हा स्कायवॉक भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा आसरा झाला आहे. तर स्कायवॉकखालील रस्ता दुकानदार आणि फेरीवाल्यांना आंदण दिलेला आहे.

अतिक्रमणे आणि जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांचीही दुर्दशा झालेली आहे. अशा रस्त्यांवर वाहतूक नियमांची कोणतीही चिन्हे किंवा मार्किंग नाहीत. शहरात शोधूनही ‘वाहनतळ सापडत नाही. अशा स्थितीत पालिका व वाहतूक पोलीस वाहतूक नियमांची अंमलबजावणी करून वाहनधारकांना वेठीस धरत आहेत. माणूस पाहून ही कारवाई करत असल्याने सामान्य नागरिकांत नाराजी आहे. सातशे रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत असल्याने तो सामान्य वाहनधारकांना परवडणारा नाही. शहरात वाहनतळ, चांगले रस्ते व त्या रस्त्यांवर वाहतूक नियमांचे कोणतेही नामोनिशाण नसताना सामान्य वाहनधारकांनी वाहने उभी तरी कुठे करायची?, असा प्रश्न यानिमित्ताने अतुल पाटील यांनी केला आहे. लाखो रुपयांची कर्ज घेऊन सामान्य नागरिकांनी खरेदी केलेली ही वाहने वाहतूक पोलीस जप्त करून कुठे तरी ठिकाणी नेऊन टाकतात. ही वाहने टोईंग करण्याबाबतही वाहतूक पोलीस आणि पालिकेचे निश्चित धोरण नसल्याने सामान्य वाहनधारकांना त्यांचा शोध घेताना अडचणी येतात. वाहनांना इजा होत असल्याने नुकसानही होते. मुळात सामान्य माणसांकरता आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करायच्या नाहीत आणि शहरात नियमाची अंमलबजावणी करायची, हे महापालिका व वाहतूक पोलिसांचे धोरण नैतिकतेला धरून आहे का?, असा सवालही पाटील यांनी केला आहे. शहरात वाहतूक नियमांचा बोजवारा उडण्यास व अनधिकृत पार्किंगला वसई-विरार महापालिका आणि वाहतूक पोलीसच उत्तेजन देत आहेत. त्यामुळे आधी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करा; मगच नियम तोडणार्‍यांविरोधात कारवाई करा, असा सल्ला शिवसेना जिल्हा सचिव पाटील यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -