डहाणू नगरपरिषदकडून कार्यालयीन जागेचा अनधिकृत वापर

अपेक्षित असताना नगर परिषदेने तसे न करता जागेचा अनधिकृत वापर सुरू ठेवल्याचा आरोप जागा मालकांनी केला आहे.

कुणाल लाडे,डहाणू : डहाणू शहरातील मुख्य बाजारपेठेत डहाणू नगरपरिषदेचे कार्यालय 2014 पासून कार्यरत आहे. कार्यालयाची जागा “लिव्ह अँड लायसेन्स” पद्धतीवर घेण्यात आली आहे. या जागेचे भाडे 2016 पासून थकीत असून जागा मालकांच्या तक्रारीनंतर काही रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. तर जागा वापराबाबत केलेला करार नूतनीकरण न केल्यामुळे खाजगी जागेचा नगरपरिषद कडून अनधिकृत वापर सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डहाणू रेल्वे स्थानक परिसरातील मल्यान भागात “कुमार कॉर्नर” या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर नगरपरिषद कार्यालय कार्यरत आहे. मालकाने 11 मार्च 2014 पासून “लिव्ह अँड लायसेन्स” तत्वावर ही जागा नगरपरिषदेला वापरण्यासाठी दिली होती. 2014 ते 2017 पर्यंत 36 महिन्यांसाठी ठराविक रक्कम प्रती महिना प्रमाणे भाडे मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार 31 जुलै 2016 पर्यंत जागा मालकाला भाडे अदा करण्यात आले. मात्र, त्यानंतर 31 जानेवारी 2017 या कराराच्या उर्वरित कालावधीत जागा मालकाला जागेचे भाडे दिले नसल्याचे आढळून येत आहे. शिवाय “लिव्ह अँड लायसेन्स” नुसार करण्यात आलेला करारनामा संपल्यावर त्याचे नुतनीकरण करून पूर्वीच्या करारात ठरल्याप्रमाणे 15 टक्के भाडेवाढ करण्याचे अपेक्षित असताना नगर परिषदेने तसे न करता जागेचा अनधिकृत वापर सुरू ठेवल्याचा आरोप जागा मालकांनी केला आहे.

पूर्वीच्या करारनाम्यातील थकबाकी व वाढीव परवाना शुल्क पाहता साधारण 1 कोटी रुपये थकबाकी असल्याची शक्यता जागा मालकांनी व्यक्त केली आहे. नगरपरिषदेने थकीत रक्कम अदा करून जागा मोकळी करावी अशा आशयाची नोटीस जागा मालकांनी नगरपरिषदेला बजावली होती. मात्र, नगरपरिषदेने आजतागायत या नोटीशीला उत्तर दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे देखील तक्रार केली असून थकीत रक्कम अदा करून जागा मोकळी करून देण्याची मागणी केल्याची माहिती जागा मालकांनी दिली आहे.

 

जुलै 2016 पासून नगरपरिषदेचे भाडे थकीत असून, ठरल्याप्रमाणे परवाना नुतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे नगरपरिषदेकडून आमच्या जागेचा अनधिकृत वापर सुरू असून त्याचा मोबदला न मिळाल्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
– राजकुमार नागशेठ

नगरपरिषद कार्यालयाच्या जागा मालकांना जागेचे थकीत परवाना शुल्क मधून काही रक्कम अदा करण्यात आली असून, साधारण 60 लाख रुपये रक्कम थकीत आहे. चालू आर्थिक वर्षात संपूर्ण थकबाकी देण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. तसेच आवश्यतेनुसार परवाना नुतनीकरण करण्यात येईल.
– वैभव आवारे, मुख्याधिकारी, डहाणू नगरपरिषद