घर पालघर डहाणू किनारपट्टी भागात वाळू तस्करी अनियंत्रित

डहाणू किनारपट्टी भागात वाळू तस्करी अनियंत्रित

Subscribe

यामुळे किनारपट्टी भागाचे सौंदर्य धोक्यात येत असून वाळू उपश्यामुळे समुद्राची पातळी किनारपट्टीवरील वस्त्यांच्या जवळ येत आहे.

डहाणू: डहाणू तालुक्यातील किनारपट्टी भागात वाळू तस्करी रोखण्यात महसूल विभाग अपयशी ठरत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. डहाणू किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवून त्याची तस्करी केली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. तलाठ्यांमार्फत या घटनेचा पंचनामा करून यामधील वाळू काही प्रमाणात ताब्यात घेण्यात आली होती. मात्र, पूर्ण वाळू ताब्यात घेण्यात आली नसून यातील उर्वरित वाळू तस्करांनी लांबवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पारनाका परिसर तहसीलदार कार्यालयापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असून या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्यामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. यामुळे किनारपट्टी भागाचे सौंदर्य धोक्यात येत असून वाळू उपश्यामुळे समुद्राची पातळी किनारपट्टीवरील वस्त्यांच्या जवळ येत आहे.

मध्यंतरी तहसीलदारांनी स्वतः एका गाडीचा पाठलाग करून तस्करांना अटक केली होती. त्यानंतर महसूल विभागाकडून गस्ती पथकाची नियुक्ती करून तस्करीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र महसूल विभागाकडून सुरू असलेले प्रयत्न देखव्यापूर्ती असल्याचे आरोप जाणकारांकडून करण्यात येत आहेत. याविषयी अधिक माहिती साठी महसूल विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

- Advertisement -

जुन्या दवाखान्यात साठा

डहाणू पारनाका परिसरातील गुरांचा जुना दवाखाना सध्या बंद स्थितीत असून त्याची पडझड झाली आहे. या इमारतीत मोठ्या प्रमाणात वाळू साठवून रात्री बेरात्री इथून वाळूची तस्करी सुरू असल्याचे प्रकार समोर आला आहे. याविषयी धनेश आक्रे यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे तक्रार केली होती. तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांनी तलाठ्यांना याविषयी माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तलाठी यांनी घटनस्थळाची पाहणी करून पंचनामा करत साठवलेल्या वाळूपैकी निम्मी वाळू तलाठी कार्यालयात जमा केली. उर्वरित वाळू जमा करण्यात तलाठी यांनी हलगर्जीपणा केला असून ही वाळू तस्करांनी लंपास केल्याचा आरोप माकपचे डहाणू शहर युनिट सेक्रेटरी धनेश आक्रे यांनी केला आहे.

- Advertisement -

 

पोलिसांच्या निदर्शनास तस्कर का येत नाहीत?

गेल्या 15 ते 20 वर्षात समुद्र किनार्‍यावरून वाळू तस्करीचे प्रकार वाढत आहेत. डहाणू परिसरात गेल्या काही वर्षात 56 घरांचे समुद्राच्या पाण्यामुळे नुकसान झाले असून वाळू उपसा असाच सुरू राहिल्यास येत्या काही वर्षात संपूर्ण वस्ती समुद्राच्या पाण्याने बाधीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाळू तस्करी साठी बैलगाडी, ट्रॅक्टर, पीकअप जीप, ट्रक आणि मोठमोठाले हायवा ट्रक वापरले जात असून या वाहनांना नंबर प्लेट नसल्यामुळे ओळख पटवण्यात अडचण येत आहे. डहाणू पारनाका, चिखला येथे रात्रीच्या वेळेस पोलीस पथक तैनात असून देखील त्यांच्या निदर्शनास तस्करांची येत नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर महसूल आणि संबधीत प्रशासनाकडून या सर्व बाबींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

साठवून ठेवलेल्या वाळूचे छायाचित्रण करून तहसीलदार डहाणू यांना कळवून तक्रार केली असता त्यांनी तलाठी यांना तत्काळ याठिकाणी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. तलाठ्यांनी पंचनामा करून यातील वाळूचा निम्मा साठा जप्त केला आणि निम्मा त्याच जागी ठेवला होता. काही दिवसांनी हा साठा तस्करांनी लंपास केला असून याबाबत तलाठ्यांना कळवले असता त्यांनी अरेरावीची भाषा करत उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.
– कॉ. धनेश आक्रे, डहाणू शहर युनिट सेक्रेटरी माकप.

- Advertisment -