घरपालघरसुंदर रस्त्याला विनाकारण मेकअप

सुंदर रस्त्याला विनाकारण मेकअप

Subscribe

मार्च अखेर असल्याने ठेकेदारांना फायदा व्हावा यासाठीच शासनाच्या निधीचा असा नाहक चुराडा केला जात असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.

बोईसर: जिल्ह्यातील अनेक रस्ते दुरूस्ती आणि डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असताना पालघर चा सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र आवश्यकता नसलेल्या रस्त्यांवर निधीचा नाहक चुराडा करीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांच्या अखत्यारीतील बेटेगाव-महागाव-कुकडे-माकडचोळा या ९ किमी रस्त्याचे २०१९ साली ग्रामीण पायाभूत विकास निधीमधून मजबुतीकरण आणि डांबरीकरण काम पूर्ण करण्यात आले होते.३ वर्षांपूर्वी काम पूर्ण करण्यात आलेला हा रस्ता महागाव जवळील १०० मीटर अंतराचा छोटासा खराब झालेला भाग वगळता इतर रस्ता हा सध्या देखील अतिशय चांगल्या स्थितीत आहे.असे असताना सा.बां.विभागाने खराब भागाची दुरूस्ती सोडून इतर चांगल्या रस्त्यावर काहीही आवश्यकता नसताना डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे.मार्च अखेर असल्याने ठेकेदारांना फायदा व्हावा यासाठीच शासनाच्या निधीचा असा नाहक चुराडा केला जात असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांच्या अंतर्गत असलेल्या अनेक खराब व खड्डेमय रस्त्यांची दुरूस्ती न झाल्याने नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून बनविण्यात आलेले नागझरी ते मासवण, दुर्वेस ते सावरे,सोमटा ते भोपोली,खंबाळे ते गारगाव,शिगाव ते वणई या रस्त्यांची कामे ठेकेदारांनी अतिशय निकृष्ठ केल्याने अवघ्या तीन ते चार वर्षातच हे रस्ते खड्ड्यात जाऊन करोडो रूपयांचा निधी वाया गेला आहे.ग्रामीण भागातील सारणी-उर्से-ऐना,कुकडे-गारगाव,तवा-पेठ-नानिवली या रस्त्यांचे मागील १५ ते २० वर्षांपासून डांबरीकरणाचे काम रखडले आहे.अशा परिस्थितीत खराब रस्त्यांवर निधी खर्च करण्याऐवजी पुन्हा पुन्हा चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची आणि डांबरीकरणाची कामे काढून सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त ठेकेदारांचे हित जोपासण्यात मग्न असल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -