तरुणांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

समुद्र सपाटीपासून उंचावर असल्याने भूजलपातळी खालावली जात असते.साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ओहोळात पाणी वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते.

मनोर: वांद्री धरणालगतचा दुर्गम भाग असलेल्या वेहलोली गावातील तरुणांनी केलेल्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.वेहलोली गावाच्या पूर्वेकडील जंगलातून वाहणार्‍या ओहोळावर बांधलेल्या बंधार्‍यात हजारो लिटर पाण्याची साठवणूक होणार असल्याचे पाळीव आणि वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार असून ग्रामस्थांना वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.कृषी विभागाच्या सहकार्याने रविवारी वेहलोली गावातील तरुणांनी वनराई बंधारा बांधला. दरवर्षी मान्सून माघारी परतल्यानंतर वांद्री धरणाचा सिंचन हंगाम सुरू होण्याआधी वेहलोली गावात पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.समुद्र सपाटीपासून उंचावर असल्याने भूजलपातळी खालावली जात असते.साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ओहोळात पाणी वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते.

वाया जाणारा पाण्याचा साठा रोखून पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने पुढाकार घेत वनराई बंधारा बांधण्याचा निश्चय केला होता. रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वेहलोली गावातील दहा तरुणांनी एकत्र येत जंगलातून वाहणार्‍या ओहोळावर श्रमदानातून बंधारा बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती. दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे पन्नास फूट लांबीचा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.जंगलातून वाहणारे हजारो लिटर पाण्याचा साठा बंधार्‍यात होणार आहे. वनराई बंधार्‍यात एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याचा साठा शिल्लक राहणार असल्याने जंगलातील वन्यप्राणी,पक्षी आणि गावातील पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार असल्याचे मत खैरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच प्रतिभा वांगड यांनी व्यक्त केले आहे. कृषी सहायक सोमनाथ तमनर यांच्या मार्गदर्शनात वनराई बंधारा बांधण्यात आला.यावेळी कृष्णा वांगड,रवींद्र अंधेर, सदानंद वांगड आणि गावातील तरुणांना श्रमदान केले.