घरपालघरगोव्याच्या धर्तीवर "वसई ख्रिसमस कार्निवल मिरवणूक"

गोव्याच्या धर्तीवर “वसई ख्रिसमस कार्निवल मिरवणूक”

Subscribe

काँग्रेसचे विजय पाटील, घोगळेवाडी गांव मंडळ अध्यक्ष नेव्हील डिसोजा, कोमसाप पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे, कार्निवल मिरवणुकीचे प्रणेते सुनील डिमेलो अणि बॅसीन कॅथॉलिक बँकेचे माजी उपाध्यक्ष गेगरी डिमेलो यावेळी उपस्थित राहणार आहेत.

वसई: नाताळ सणानिमित्त भारत देशात गोव्याच्या धर्तीवर निघणारी “वसई ख्रिसमस कार्निवल मिरवणूक” दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा काढली जाणार आहे. गेले महिनाभर चाललेली यंदाच्या कार्निवल मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, तिचा मार्ग अणि एकंदर रूपरेषा निश्चित झाली आहे. नाताळच्या दिवशी २५ डिसेंबर, रविवारी दुपारी २ वाजता रमेदीतील घोगळेवाडी येथून कार्निवल मिरवणूक प्रस्थान करणार आहे.
काँग्रेसचे विजय पाटील, घोगळेवाडी गांव मंडळ अध्यक्ष नेव्हील डिसोजा, कोमसाप पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे, कार्निवल मिरवणुकीचे प्रणेते सुनील डिमेलो अणि बॅसीन कॅथॉलिक बँकेचे माजी उपाध्यक्ष गेगरी डिमेलो यावेळी उपस्थित राहणार आहेत.

नाताळचा हर्ष अणि आनंद देणार्‍या विविध उपक्रमासोबतच जनजागृती, तथा सामाजिक प्रबोधनाचे देखावे आकर्षकरित्या या मिरवणुकीतून पहायला मिळतात. या मिरवणुकीला लाभलेले सर्वधर्मीय स्वरूप आणि स्थानिय संस्कृती, परंपरा यांच्या संवर्धनाची जोड यामुळे ती आणखी वैशिष्ट्यपूर्ण होऊन सर्वच वसईकरांसाठी कुतूहल, तसेच औत्सुक्याचा भाग बनली आहे. वसईचा नाताळ म्हटल्यावर आधी त्याचे अनेकाविध वैशिष्ट्ये सांगितले जायचे. मात्र, आता सर्वात अग्रभागी हा उंट, हत्ती आणि घोड्यांच्या सहभागाने भरवल्या जाणारा, पारंपरिक वेशभूषेत अबालवृद्ध उत्साहाने सहभाग देणारा, तसेच अनेक सामाजिक जनजागृतीचा पुरस्कार करणारा हा कार्निवल उपक्रम वसईत लक्षवेधी ठरतो आहे.

- Advertisement -

24 डिसेंबरच्या, मध्यरात्रीच्या प्रभू येशू जन्माच्या मिस्सानंतर (प्रार्थना ) दुसर्‍यादिवशी २५ डिसेंबरला ख्रिस्तजन घरोघरी सणाच्या उत्साह आणि चैतन्यात न्हावून निघतात. मात्र वसई गांव (प ), रमेदी धर्मग्रामातील घोगळेवाडी येथील युवकांनी, नाताळच्या निमित्ताने सर्वच धर्मीय बांधवांना एकत्र करीत, घरातील लहान मुले, महिला आणि वृद्धांनाही सार्वजनिक स्थरावर सणाचा आनंद मोकळेपणाने लुटता यावा, म्हणून सन २०१३ मध्ये पहिली कार्निवल मिरवणूक वसईत काढली. जी प्रचंड गाजली अणि सर्वांच्या लक्षात राहिली.

घोगळेवाडी, (रमेदी ) गांव मंडळ अणि त्याचे तत्कालीन कार्निवल समितीचे अध्यक्ष फ्रेडी डिमेलो यांनी सतत सात वर्ष कार्यरत राहून वाढत्या सहभागाने मिरवणूक काढली. त्यांना पडद्यामागून हवे ते सहाय्य करणारे बॅसीन कॅथोलिक सहकारी बँकेचे माजी संचालक सुनील डिमेलो यांनी मिरवणूक भव्य अणि दर्जेदार कशी होईल, असा सतत प्रयत्न ठेवला. मात्र, कोरोनामुळे वसईकरांची मागणी असूनही गेली दोन वर्ष मिरवणूक काढता आली नव्हती. म्हणून यावर्षी अधिक व्यापक प्रमाणात कार्निवल काढायचा ठरले असून, मोठया उत्साहात त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन कर्निवल समितिचे नवे अध्यक्ष रॅन्डोल डिमेलो यांनी केले आहे.
यंदा कोविडविषयी जागृती, प्लास्टिक हटाव अणि एकंदर पर्यावरण विषयक प्रबोधन, महाराष्ट्र अणि वसईच्या संस्कृती-परंपरा यांचे जतन, अंधश्रद्धा निर्मूलन आदी सामाजिक प्रश्न सोबत घेऊन हा कार्निवल अधिक लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न केला आहे. उंट, घोडे आदी ऐश्वर्यपूर्ण दिमाखात तीन राजे अणि त्यांचा लवाजमा या मिरवणुकीत दिसणार असून, भारतीय संस्कृतीचे दर्शन या कार्निवलमधून दर्शकांना अनुभवता येणार आहे. २५ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता या कार्निवलची घोगळेवाडी, रमेदी येथून सुरुवात होणार असून, पुढे होळी मार्गे आक्टन, बंगली, बंगलीहून मधून पापडी नाका गाठून तेथून तामतलाव, पारनाका (वसई ), मिलागरी क्रॉस अणि सायंकाळी ७ वाजता मिरवणूक घोगळे गावात पोहचून तिचा समारोप होणार असल्याची माहिती डिमेलो यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -