विरार : भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सवांतर्गत सन २०२४-२०२५ पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली २२ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचार्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते. संविधान हे एक जिवंत दस्ताऐवज आहे, जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संविधानाचे महत्त्व, त्यातील मूल्ये याबद्दल समाजातील सर्व घटकात जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव अंतर्गत वर्षभर पालिकेतील विविध विभाग तसेच प्रभाग समिती स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरीता महानगरपालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे ( उत्तर विभाग ) व अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे ( दक्षिण विभाग ) यांच्या सहअध्यक्षतेखाली “घर घर संविधान समिती” गठन करण्यात आली आहे.
संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविका/उद्देशिकेचे महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात अधिकारी /कर्मचारी यांच्यामार्फत २६ नोव्हेंबर रोजी सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. तसेच या दिनी सर्व प्रभाग समिती स्तरावर भारतीय घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी शाळा महाविद्यालयांतील शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी भारतीय राज्यघटनेचे महत्व सांगणार्या विषयावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा शाळा महाविद्यालयात घेण्यात येणार आहेत. सर्व राष्ट्रीय सणादिवशी संविधान प्रास्ताविका उद्देशिकेचे सामूहिक वाचन, घटनात्मक मूल्यसंस्कार समाजात रुजवण्यासाठी महिला बचत गटांमार्फत पथनाट्य सादरीकरण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी महानगरपालिका अंतर्गत सर्व नागरिकांनी भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेवून लोकशाहीचे बळकटीकरण करावे, असे आवाहन महानगरपालिकेव्दारे करण्यात आले आहे.