विरार : हवामानातील सततच्या बदलामुळे वसई- विरार शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. वसईत धुक्याचे आणि धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. धुलीकणांसह येणार्या वार्यामुळे शहरात धुळीची चादर निर्माण झाली आहे. त्याचा परिमाण अजूनही शहरातील हवेत जाणवत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पी एम २.५ आणि पी एम १० या घातक कणांचे हवेतील प्रमाण वाढले आहे. जागोजागी वाढते बांधकाम, खुले आर एम सी प्लांट, कचरा संकलनासाठी वापरल्या जाणार्या खुल्या गाड्या अशा अनेक बाबींमुळे वसई-विरार शहरातील हवेची गुणवत्ता घसरली आहे.
वसई- विरार शहराला लागून असणार्या मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आणि संपूर्ण शहरात रेडिमिक्स सिमेंट कारखाने आहेत. तसेच काँक्रिटीकरण, अंतर्गत रस्त्यांचे नुतनीकरण यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे वसई आणि विरार शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावली आहे. सामान्यतः ० ते ५० या श्रेणीतील एक्युआई (एअर क्वालिटी इंडेक्स) आरोग्यासाठी चांगला मानला जातो. तर ५१ ते १०० मधील एक्युआई समाधानकारक असतो. १०१ ते २०० हा एक्युआई मध्यम प्रमाणात आरोग्यावर प्रभाव टाकतो आणि २०१ ते ३०० हा एक्युआई आरोग्यासाठी घातक मानला जातो.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, विरारच्या बोळिंज परिसरात हवेचा एक्युआई 159 US AQI वर पोहोचला आहे. वसईच्या नवघर परिसरात १४२, तर बोईसरमध्ये १०८ वर नोंदवला गेला आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध अंमलबजावणी संस्थांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये प्रामुख्याने बांधकाम व पाडकाम, वाहनांचा धूर, रस्त्यांवरील धूळ, स्मशानभूमी, बेकरी इत्यादी प्रमुख प्रदूषण स्रोतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा समावेश आहे.
नियमांचे पालन न करणार्या
प्रकल्प मालकांवर कारवाईची मागणी
मुंबई -अहमदाबाद महामार्गालगत हिरवळ असतानाही प्रकल्पातून सतत उडणार्या धुळीने येथील निसर्गरम्य परिसराची धूळधाण होऊ लागली आहे. अनेक झाडांवर धूलिकण बसून हिरवी झाडे ही धुळीने भरली आहेत. तर भात शेतीचे क्षेत्र, विविध प्रकारची फळझाडेही धुळीच्या प्रादुभार्वामुळे अडचणीत सापडू लागली आहेत, अशी माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली. तसेच या प्रदूषणकारी प्रकल्पांची तपासणी करून नियमाचे पालन न करणार्या प्रकल्प मालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचना
1) १ एकर हून जास्त क्षेत्रफळ असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांच्या आजूबाजूला किमान २५ फूट उंचीची लोखंडी पत्र्यांची भिंत उभारणे आवश्यक आहे.
2) बांधकाम सुरू असलेल्या सर्व इमारती ओल्या हिरव्या कापडाने किंवा ताडपत्रीने झाकणे बंधनकारक आहे. पाडकाम सुरू असलेल्या सर्व संरचनांना वरपासून खालपर्यंत ताडपत्रीने झाकणे. तसेच पाडकामाच्या वेळी सातत्याने पाण्याची फवारणी करणे. त्याचबरोबर बांधकामस्थळी पाणी फवारणीसाठी अँटी-स्मॉग गनचा वापर करणे आणि वाहतूक करणार्या वाहनांना संपूर्णपणे झाकणे व ओव्हरलोड होऊ नये याची खात्री करणे बंधनकारक असणार आहे.
3) वरील सर्व निदेशांचे पालन करण्याचे व १० दिवसांत कार्यवाही अहवाल सादर करण्याच्या सूचना ही प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्या आहेत.