विरार : पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक नाले महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र वसई-विरार शहरातील अनेक नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. भूमाफियांनी या नैसर्गिक नाल्यांचा कब्जा करून बांधकामांचा सपाटा लावला आहे. यामुळे काही ठिकाणी नाले नष्ट झाले आहेत, तर काही ठिकाणी ते अरुंद झाले आहेत. पाण्याचा निचरा होण्याचे मार्गच नष्ट होत असल्याने वसई- विरार शहरात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे.
वसई- विरार शहरात गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना पुराचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे वसईकरांचे जनजीवन विस्कळीत होत असते. मात्र पालिका प्रशासन यावर काहीच उपाययोजना करत नाही. उलट शहरातील नैसर्गिक नाल्यांवरच अतिक्रमण होत असून पालिकेचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे, असा आरोप पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला आहे.
वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणे पाडली जात नाहीत. अतिक्रमण करणार्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, तसेच त्यांची चौकशीही होत नाही, अतिक्रमणे हटविण्यास कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे परिसराचा मूळचा आकृतीबंध नष्ट होऊन पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद होत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून वसई- विरारकरांना पुराचा सामना करावा लागत आहे.वसई- विरार पालिकेला ‘निरी’ या समितीनेही नाल्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अद्यापही या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच पालिका यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही. यामुळे पालिकेने असे नाले मोकळे करून घ्यावे जेणेकरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विरार पूर्वेकडील जीवदानी डोंगराकडून येणारा नैसर्गिक नाला नामशेष झाला आहे. यामुळे डोंगराचे येणारे संपूर्ण पाणी हे तेथील स्थानिक गावातील नागरिकांच्या घरामध्ये गुडग्यावर साचले जाते. याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना तसेच मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाकडे जाणार्या शहराच्या वाहतूक कोंडीवर देखील पडत असतो.