विरार : वसई- विरार शहरात वाहन तळाची समस्या गंभीर होत चालली असून वर्दळीच्या ठिकाणी पार्किंगचे जाळे पसरत चालले आहे. यामुळे शहरात राजरोसपणे वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले असून रहदारीसाठी अडथळे निर्माण होत आहेत. मात्र महापालिकेने तसेच वाहतूक पोलिसांनी या समस्येकडे कानाडोळा केले असल्याचे चित्र दिसून आले आहे.
वसई-विरार शहरातील रस्ते हे वाहनांच्या अनधिकृत पार्किंगने आणि फेरीवाल्यांनी गजबजत चालले आहेत. यामुळे वाहनचालक व सामान्य नागरिकांना मोठी कसरत करून प्रवास करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांवर अनधिकृत वाहन पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी व तीन चाकी गाड्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर संध्याकाळच्यावेळी फेरीवाले जागा मिळेल तिथे आपले बस्थान मांडत आहेत. यामुळे आधीच बेकायदेशीर पार्किंग अरुंद झालेले रस्ते फेरीवाल्यांमुळे पूर्णतः व्यापले जात आहेत. यामुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत असून वाहन चालकांना वाहन चालवणे अवघड होते तर वाटसरूंना चालण्यासाठी जागा मिळत नाहीत. आधीच छोटे रस्ते त्यात वाहनांनी अर्धा व्यापलेला रस्ता त्यामुळे शहरातील रस्त्यावर गाडी चालवावी कि नाही असा प्रश्न वाहनचालकांना भेडसावत आहे.
वसई- विरार शहराची लोकसंख्या वाढत असून रस्ते मात्र तेवढेच आहेत. त्यातही रस्त्यांववर अतिक्रमणे आणि बेशिस्त वाहनांची वाढती संख्या यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच आता रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृतपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालणे देखील आता मुश्किल झाले आहे. विरार पुर्वेकडील वीर सावरकर मार्ग, मनवेलपाडा रोड, मोहक सिटी, नाईंटी फिट रोड, फुलपाडा रोड, नालासोपारा मधील श्रीप्रस्थ ग्राऊंड, संयुक्त नगर, रिध्दिविनायक रुग्णालयाजवळ, वसई पूर्वेकडील स्थानक परिसर अंबाडी रोड, माणिकपूर नाका, इत्यादी ठिकाणी अधिकृत पार्किंगचे प्रस्त वाढले आहे. येथे शाळेच्या बसेस, पाण्याचे टँकर, खाजगी बसेस तसेच दुचाकी, तिनचाकी, चारचाकी इत्यादी शेकडो गाड्यांचे अनधिकृत पार्किंग होत असल्याचे दिसून आले आहे.
मास्टर प्लॅन बासनात गुंडाळला
वसई- विरार शहराची लोकसंख्येप्रमाणे वाहनांची गर्दी वाढत आहे. दररोज सव्वादोनशे नवीन वाहने रस्त्यावर येत असतात. रस्ते निमुळते असून वाहन पार्किंग पासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षीका शारदा राऊत यांनी मास्टर प्लॅन तयार केला होता. या आराखड्यानुसार ५८ ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्याचे प्रस्ताव देण्यात आले होते. २०६ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एकदिशा मार्ग तयार करण्याचे नमूद करण्यात आलेले होते. वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली असून वाहनतळ उभारण्याच्या सुचनाही केलेल्या होत्या. त्यासाठी शहरातील अनेक ठिकाणांचे सर्व्हेक्षणही करण्यात आलेले होते. मात्र हा मास्टर प्लॅन पालिकेने बासनात गुंडाळून ठेवला आहे. पालिकेने वाहनांची पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी बहुजमली पार्किंग उभारण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. मात्र अद्याप एकही बहुजमली पार्किंग शहरात उभी नाही.
Edited By Roshan Chinchwalkar