वसई: वसईतील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयातील डॉक्टर डेलिसा परेरा (३९) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी डेलिसा यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे. डेलिसा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पतीचे अनैतिक संबंध होते आणि त्यावरून पती शारिरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे म्हटले होते.
डॉ. डेलिसा परेरा (३९) या पापडीच्या सोनारभाट येथे पती रॉयल परेरा आणि १२ वर्षांच्या मुलीसह रहात होत्या. त्या वसईच्या बंगली येथील प्रसिध्द कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात फिजिओथेरेपिस्ट म्हणून कार्यरत होत्या. सोमवारी संध्याकाळी त्यांनी पापडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्या पापडी येथील चर्च मध्ये मिस्सा (प्रार्थना) करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पापडी चर्चच्या फादरांना भेटून एक लिफाफा दिला होता. त्यामध्ये एक चिठ्ठी होती. फादरांनी ही चिठ्ठी मयत डॉ डेलिसा परेरा यांच्या आईला दिली. या चिठ्ठीतून हा खुलासा झाला.
चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे, डेलिसा यांचे पती रॉयल परेरा याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून तो डॉ डेलिसा यांना शारिरिक आणि मानसिक त्रास देत होता. २६ नोव्हेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत रॉयलने शारिरीक आणि मानसिक त्रास दिल्याचे या चिठ्ठीत डेलिसाने म्हटले होते. याप्रकरणी मयत डेलिसा यांच्या आईने तक्रार दिल्यानंतर वसई पोलिसांनी आरोपी रॉयल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. डेेलिसा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आला आहे.
हॉस्पिटलमधील सहकारी भावूक
डॉ. डेलिसा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यांनी विवाहित महिलांसाठी असणार्या मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेऊन अंतिम फेरित स्थान मिळवले होते.‘डॉ डेलिस या मनमिळावू होत्या. रुग्णांध्ये त्या लोकप्रिय होत्या. त्याचा असा मृत्यू चटका देणारा आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांच्या सहकार्यांनी दिली आहे. ‘डॉ. डेलिसा या खूप प्रेमळ होत्या. ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा त्या नेहमीप्रमाणे कामावर होत्या. सर्व रुग्ण त्यांनी तपासले. रुग्णालयात नवीन यंत्र येणार होते त्याची देखील त्यांनी चौकशी केली’ असे कार्डिनल ग्रेशस रुग्णालयाच्या परिचारिका अस्मिता पाटील यांनी सांगितले.