घरपालघरवसईकरांमुळे जनसेवा करण्यास बळ मिळाले

वसईकरांमुळे जनसेवा करण्यास बळ मिळाले

Subscribe

येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ खास टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी, वसईतील बिशप हाऊसमध्येच घेण्याचा अधिक संयुक्तिक सल्ला दिला होता. ही आठवण सुद्धा नाईक यांनी यावेळी आवर्जून सांगितली.

वसईः वसईकरांनी माझ्यावर प्रेम व्यक्त केल्याने जनसेवेच्या कामांसाठी अधिकच बळ मिळाले आहे. मी ६० वर्षांपासून राजकीय, सामाजिक कार्य निष्कलंकीतपणे करीत आहे. आज मला वसईकरांच्या प्रेमात पद्मभूषण पुरस्काराचा आविष्कार दिसतो आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल राम नाईक यांनी वसईत बोलताना केले. माजी केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वसईत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राम नाईक बोलत होते. अर्नाळा किल्ल्यात वीज नेल्याच्या घटनेला २२ वर्षे झाली. दरवर्षी न चुकता तेथील नागरिक माझी आठवण म्हणून प्रकाशदिन साजरा करतात. रेल्वे ट्रेनमध्ये मच्छीमार व भाजी विक्रेत्यांना माल नेण्यासाठी राखीव डब्याची सोय केली म्हणून येथील भगिनी मला आपला भाऊ मानतात. डहाणू,पालघर, वसई विभागांतील नागरिकांसाठी डहाणू ते चर्चगेट शटल सुरू केल्यानंतर त्या ट्रेनला “राम नाईक शटल”असे म्हणण्यास जनतेने स्वतःहून सुरूवात केली. मी कॅन्सरने आजारी असताना ख्रिस्ती बांधवांनी माझ्यासाठी चर्चमधून प्रार्थना केली. येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ खास टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी, वसईतील बिशप हाऊसमध्येच घेण्याचा अधिक संयुक्तिक सल्ला दिला होता. ही आठवण सुद्धा नाईक यांनी यावेळी आवर्जून सांगितली.

संसदेच्या दोन्ही सभागृहात जनगणमन आणि वंदेमातरम म्हणण्याची परंपरा सुरु होणे, तसेच देशभरातील खासदारांना आपापल्या मतदारसंघात सार्वजनिक कामासाठी स्वतंत्र खासदार फंड देण्यास सुरुवात माझ्या मागणीवर झाली. या माझ्या संसदीय कारकिर्दीतील परमोच्च आनंद देणार्‍या घटना असल्याचेही नाईक यांची यावेळी सांगितले. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या नागरी सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून विकार जनरल फादर डॉ. ज्योएल डिकुना, बौद्ध धर्मगुरू भंन्ते महामोगलायन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास वर्तक, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.इश्वर धुळे, आगरी समाजाचे नेते मदन किणी, भाजपचे यशवंत पाटील, राजन नाईक, केदारनाथ म्हात्रे, मॅथ्यू कोलासो, कांचन झा, महेश सरवणकर उपस्थित होते.

- Advertisement -

विविध सन्मानाची पदे येतात आणि जातात. पदांपेक्षा माणसाची पत महत्त्वाची असते. व्यक्ती आणि व्यक्तीचे आदर्श महत्त्वाचे असतात. राम नाईक यांनी आपल्या कर्तृत्वातून सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय वसईकरांच्या मनात स्वतःबद्दल निर्माण केलेले आदराचे स्थान, ही अलौकिक बाब आहे. सामान्य माणसांचे अश्रू त्यांना दिसले म्हणून त्यांना असामान्य उंची प्राप्त झाली. यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श राजकारणाची परंपरा पुढे नेणार्‍यांपैकी राम नाईक हे महत्त्वाचे नाव आहे. समाज आणि राजकारणात सर्वत्र नकारात्मक चित्र असताना, पुन्हा उजाडणार आहे, हा आशेचा किरण ज्यांच्यामुळे अद्याप शिल्लक आहे, त्यापैकी एक म्हणजे राम नाईक होय, असे प्रतिपादन बबनशेठ नाईक यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर धुरी यांनी, तर सुत्रसंचलन प्रा.डॉ. ललीता पाटील यांनी केले. प्रज्ञा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम संपल्यानंतर राम नाईक यांनी आजारी असलेल्या माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस व फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची विचारपूस केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -