वसईः सोमवारी सामान्य जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी पालघर जिल्हा शिवसेनेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) धडक देत प्रशासनाला जाब विचारला. शिवसेना नेते तथा आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात ‘वसई-विरारकरांच्या हक्काचे पाणी दिवाळीपूर्वी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार सुनील शिंदे यांनी याप्रसंगी केली. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय देणार नाही, अशा गगनभेदी घोषणांनी एमएमआरडीए कार्यालयाचा परिसर पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या नियोजनात शिवसैनिकांनी दणाणून सोडला. शिवसैनिकांचा वाढता जलआक्रोश पाहून एमएमआरडीए प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. अनेकांची धरपकड करत पोलीस व्हॅनमध्ये डांबून आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आंदोलनकर्त्यांनी आपली मागणी आणखी जोरदारपणे लावून धरली. परिणामी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला आंदोलकांची दखल घ्यावी लागली. एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल आंदोलकांना सामोरे गेले. त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व लवकरात लवकर वसई-विरारकरांना पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासित केले.
सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेतून वसई-विरार महापालिकेला मिळणार्या 185 दशलक्ष लिटर पाण्यापैकी 70 ते 80 दशलक्ष लिटर पाणी जून 2023 अखेर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महापालिकेसोबतच्या 21 जून 2023च्या बैठकीत दिले होते. उपलब्ध पाणी शहरात आणण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत अंथरण्यात येणार्या जलवाहिनीचे काम पूर्ण करून उच्च दाब चाचणी घेण्यास एमएमआरडीएने कळविले होते. त्यानंतर काशिद-कोपर येथील संतुलन टाकीतून पाणी उपलब्ध करून नवीन अंथरण्यात आलेल्या जलवाहिनीचे निर्जंतुकीकरण व जलवाहिनी स्वच्छ करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देशही एमएमआरडीएने महापालिकेला दिले होते. त्यानुसार वसई-विरार महापालिकेने 31 जुलै 2023 रोजी जलदाब चाचणी तसेच जलवाहिनीचे निर्जंतुकीकरण व जलवाहिनी स्वच्छ करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. मात्र सप्टेंबर अखेर आला तरी एमएमआरडीएकडून ही आश्वासनपूर्ती झालेली नाही.
राजकीय साटमारीमुळे समस्या
सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेतून वसई-विरार महापालिकेला मिळणार्या 185 दशलक्ष लिटर पाण्यापैकी 70 ते 80 दशलक्ष लिटर पाण्यावर वसईत जाणीवपूर्वक राजकारण पेटवण्यात आले आहे; परंतु या राजकीय साटमारीत शहरातील 24 लाख लोकसंख्येला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच वसईकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी शिवसेनेने एमएमआरडीए मुंबई-वांद्रे कार्यालयावर ही धडक दिली होती, अशी माहिती जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली.