मनोर: दक्षता पथकाला मनोर -विक्रमगड रस्त्यावर खैर तस्करी रोखण्यात यश आले आहे.वाडा येथील दक्षता पथकाकडून गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जव्हार फाटा येथे केलेल्या कारवाईत सोलीव खैराचे 750 ओंडके वाहतूक करणारा आयशर टेम्पो जप्त करण्यात आला आहे. एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अटक केलेल्या टेम्पो चालकाविरोधात भारतीय वन अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाच्या जव्हार उपवन संरक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मनोर- विक्रमगड रस्त्यावरून खैराची तस्करी होणार असल्याची माहिती वाडा येथील दक्षता पथकाला मिळाली होती. गुरुवारी सायंकाळ पासून दक्षता पथकाने मनोर विक्रमगड रस्त्यावर सापळा रचला होता. गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास संशयास्पद टेम्पो दिसून आल्यानंतर दक्षता पाठकाकडून टेम्पोचा पाठलाग करून महामार्गावरील जव्हार फाटा येथे टेम्पो अडवण्यात यश आले.टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो मध्ये मौल्यवान खैर जातीच्या लाकडाचे सोलीव ओंडके आढळून आले.टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन आयशर टेम्पा सह खैराचे ओंडके जप्त करण्यात आले. शुक्रवारी सकाळी टेम्पो मधील खैराच्या ओंडक्याची मोजणी केली असता 750 ओंडके आढळून आले.खैराच्या ओंडक्यांची किंमत दहा लाख रुपये असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. कारवाईत टेम्पो सह खैराचे ओंडके मिळून 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर शुक्रवारी टेम्पो चालकाला न्यायालयात हजर करण्यात आले होते.न्यायालयाने चालकाला एका दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.