विधानसभेच्या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यातच नालासोपारा आणि विरारमध्ये मोठा राडा झाला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हेच वादाच्या भोवऱ्यात सापडले. विनोद तावडे यांनी नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर आणि कार्यकर्त्यांनी केला.
तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तब्बल तीन तास रोखून धरलं होतं. यानंतर विनोद तावडे यांनी आपल्याला तब्बल 25 फोन केले. मला माफ करा, मला जाऊद्या, अशी विनवणी केल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. मात्र, “मुलासाठी हितेंद्र ठाकूर हे काहीही बोलत आहेत,” असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
हेही वाचा : पैसे वाटल्याचा आरोप, तीन तास राडा; अखेर विनोद तावडे मोजक्या वाक्यात बोलले अन् हात जोडून निघून गेले
विनोद तावडे म्हणाले, “हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मी कार्यकर्त्यांना भेटून निवडणुकीसंदर्भात चर्चा करून निघणार होतो. मात्र, बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना वाटलं की मी पैसे वाटत आहे. निवडणूक आयोगानं माझी गाडी आणि रूम तपासली आहे. मी 40 वर्षे राजकारण कुठलेही पैसे वाटले नाहीत. त्यामुळे कोणी काहीही आरोप केले, तरी विनोद तावडे काय आहे? हे लोकांना माहिती आहे.”
हितेंद्र ठाकुरांना 25 फोन केले, माफ करा जाऊद्या, असं म्हटलं होतं का? हा प्रश्न विचारल्यावर तावडेंनी म्हटलं, “हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा निवडणुकीसाठी उभा असल्यानं काहीही बोलत आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, हितेंद्र ठाकूर आमचे मित्र आहेत. निवडणुकीत आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो.”
हेही वाचा : विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप होताच उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…